थकीत वीज बिल हप्त्याने भरण्याची योजना पुन्हा सुरू करणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना महामारीच्या दुसऱया लाटेचा मोठा फटका राज्यातील घरगुती ग्राहकांबरोबरच औद्योगिक ग्राहकांनाही बसलेला असतानाच आता तिसरी लाट येणार असल्याचा अंदाज आहे. त्याची दखल घेत वीज बिल थकीत असलेल्या ग्राहकांना थकबाकीची रक्कम हप्त्याने भरण्याची सवलत उपलब्ध करून देण्याबाबत योग्य निर्णय घेतला जाणार असल्याचे आश्वासन राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले आहे.

लॉकडाऊनमुळे राज्यातील उद्योगधंद्यांना मोठा फटका बसला असून त्यांना मासिक वीज बिलाची रक्कम भरणे कठीण झाले आहे. तसेच कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर महावितरणने 13 नोव्हेंबर 2020 राजी थकीत वीज बिल हप्त्याने भरण्याची योजना सुरू केली होती. मात्र सदर हप्ते योजना 31 मार्च रोजी बंद झाली आहे. दरम्यान, कोरोनाच्या दुसऱया लाटेमुळे गेल्या दोन महिन्यांपासून लॉकडाऊन आहे, तसेच कोरोनाची तिसरी लाटही येणार आहे. त्यामुळे पुढील काळातही वीज ग्राहकांना थकीत वीज बिल एकरकमी भरणे शक्य नाही. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेने ऊर्जामंत्र्यांची भेट घेत वीज बिल हप्त्याने भरण्याची योजना सुरू करण्याबाबत निवेदन दिले. यावेळी थकीत वीज बिल हप्त्याने भरण्याची योजना सुरू करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल असे आश्वासन दिल्याचे वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे यांनी सांगितले.