सौरऊर्जेपासून मिळणार वीज

>>स्पायडरमॅन

वॉशिंग्टनमधील शास्त्रज्ञांनी एका अशा अनोख्या पदार्थाचा शोध लावला आहे, ज्याच्या मदतीने सूर्याच्या उष्णतेपासून अत्यंत कमी खर्चात आणि सहजपणे विजेची निर्मिती करता येणार आहे. रात्रीच्या वेळी किंवा ढगाळ वातावरणात देखील या उष्णतेपासून बनवलेल्या विजेचा वापर कमी खर्चिक असणार आहे. हे संशोधन म्हणजे वीज निर्मिती क्षेत्रातले एक महत्त्वाचे पाऊल असून ही वीज निर्मिती प्रक्रिया ही सध्या जीवाश्म इंधनापासून वीज बनवण्यात जेवढा खर्च येतो, त्याच्यापेक्षाही कमी खर्चाची असणार आहे हे विशेष. सकेंद्रित अशी सौर ऊर्जेची सयंत्रे सौर ऊर्जेला विजेमध्ये बदलण्यासाठी आरसा किंवा विविध लेन्सच्या मदतीने प्रकाशाला एका छोटय़ा स्थानावरती एकत्र केंद्रित करतात, ज्यामुळे मोठय़ा प्रमाणावरती उष्णता निर्माण होते. ही उष्णता मग ‘मॉल्टन सॉल्ट’मध्ये स्थानांतरित केली जाते. हे मॉल्टन सॉल्ट एका विशिष्ट तापमानापर्यंत कठीण अवस्थेत असते, मात्र तापमान एका बिंदूच्या वरती वाढायला लागले की, हे मॉल्टन सॉल्ट द्रव्यात परिवर्तित होते आणि त्याच्या या वैशिष्टय़ांमुळेच उष्णतेला स्थानांतरित करण्यासाठी तरल पदार्थ म्हणून याचा वापर करणे शक्य होणार आहे. यानंतर मॉल्टन सॉल्टच्या उष्णतेला पुन्हा एकदा वार्ंकग फ्लुएड सुपरक्रिटिकल अशा कार्बनडाय ऑक्साइडमध्ये स्थानांतर केले जाते आणि त्याचा वापर वीज निर्मितीचे कार्य करणाऱ्या यंत्राला ऊर्जा देण्यासाठी करण्यात येतो. सौर ऊर्जेला अशा प्रकारे उष्णतेच्या माध्यमातून जतन करणे हे एखाद्या बॅटरीच्या माध्यमातून ऊर्जा जतन करण्यापेक्षा देखील स्वस्त आहे हे याचे वैशिष्टय़ आहे. जोडीलाच याच्यापासून ग्रीनहाऊस गॅसचेदेखील शून्य उत्सर्जन होते आणि प्रदूषणाला निर्बंध घालता येतो. सौर ऊर्जेचे विजेत रूपांतर करणाऱ्या या यंत्राला तेवढय़ाच ऊर्जेत जास्तीत जास्त वीज निर्मिती करणे गरजेचे असणार आहे, तरच ही वीज स्वस्त किमतीत तयार होऊ शकेल. यासाठीच शास्त्रज्ञांनी सिरॅमिक जर्कोनिअम कार्बाइड आणि टंगस्टन धातूच्या मिश्रणातून या उष्णतेचे वहन करणारा पदार्थ शोधण्यात यश मिळवले आहे.