
राज्यातील वीज ग्राहकांना अखंडित वीज पुरवठ्याबरोबरच स्वस्त दराने वीजपुरवठा करणार असल्याची ग्वाही राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिली. त्यासाठी महावितरणसह महानिर्मिती आणि महापारेषण या वीज कंपन्यांच्या अधिकारी-कर्मचार्यांनी कामाला लागावे असे निर्देश दिले.
ऊर्जा विभागाचा पदभार स्वीकारल्यानंतर नितीन राऊत यांनी तिन्ही वीज कंपन्यांच्या फोर्ट येथील सांघिक कार्यालयाला भेट देऊन आढावा घेतला. आपला ग्राहक हा सर्वसामान्यांपासून श्रीमंतांपर्यंत सर्वचजण आहेत. पण काम करताना आपण सर्वसामान्यांना डोळ्यासमोर ठेवले पाहिजे. त्यांना परवडेल अशा दराने वीज उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. त्यासाठी वीज वितरण हानी कमी करणे गरजेचे असल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले. तसेच ऊर्जा विभागात नवीन योजना आणून ग्राहकांना चांगल्या सेवा द्याव्यात, असेही त्यांनी सांगितले.
























































