पुण्यात वीज कर्मचारी महिलेचा कोयत्याने वार करून खून

वीजबिल जास्त येते, घरच्या वीजमीटर त्वरित तपासावा, अशी मागणी करून महावितरणने दुर्लक्ष केल्याने एका तरुणाने वीज उपकेंद्रात जाऊन तेथे असणाऱया महिला कर्मचाऱयावर भरदिवसा कोयत्याने वार केले. या हल्ल्यात जखमी झालेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. रिंकू राम थिटे असे खून झालेल्या मोरगाव वीज उपकेंद्रातील महिला कर्मचाऱयाचे नाव आहे. अभिजीत पोटे (रा. मोरगाव) असे अटक केलेल्याचे नाव आहे. घरातील वीजबिल जास्त प्रमाणात येत होते. त्यामुळे वीज मीटर त्वरित तपासण्याची मागणी पोटे याने केली होती. याबाबत त्याने आठ दिवसांपूर्वी वीज उपकेंद्रात तक्रार दाखल केली होती. या वेळी त्याच्या तक्रारीची दखल घेतली जात नाही, असे त्याला वाटत होते. त्यामुळे त्याने महावितरणच्या कर्मचाऱयांना जाब विचारला. रिंकू राम थिटे ही त्याच्याशी बोलत असताना त्याने रागाने तिच्यावर ऊस तोडण्याच्या कोयत्याने वार केले. यात महिला कर्मचारी गंभीर जखमी झाली. तिच्यावर पुणे येथील सह्याद्री रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला. तपास सुपे पोलीस स्टेशनचे सहायक पोलास निरीक्षक नागनाथ पाटील करीत आहेत.