कोल्हापुरातील आजरा तालुक्यात हत्तींचा धुमाकूळ; शेतकरी मेटाकुटीस

551

आजरा तालुक्यात 15 वर्षांपासून हत्ती दरवर्षी येऊन शेतीचे नुकसान करत आहेत. तालुक्याच्या पश्चिम भागातील सुळेरान, घाटकरवाडी, धनगरमोळापासून मसोली, खानापूर, वेळवट्टी दरम्यानच्या पट्ट्यात त्यांचा वावर आणि धुमाकूळ नेहमीचा आहे. शेतकरी आणि वनविभागाला हत्ती जुमानत नसून शेतातील पिकांचे, फळबागांचे आणि अवजारांचे नुकसान करीत असल्याने त्यांना आवरणे कठीण झाले आहे. दररोज हजारोंच्या घरात नुकसान होत असताना ते बघण्याशिवाय शेतकऱ्यांकडे पर्याय नाही. कोणत्याही स्थितीत या हत्तींचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

सध्या पावसाळ्याच्या सुरुवातीला रोपलावण आणि शेतातील मशागतीची कामे सुरू असताना सायंकाळ ते मध्यरात्रीच्या सुमारास हत्ती येथील शेतीत उतरून नुकसान करीत आहे. चाळोबा आणि धनगरमोळा जंगलात दिवसभर वास्तव्य करीत रात्री हत्तींचा धुमाकूळ सुरू होतो. गेल्या दोन दिवसात सुळेरान येथील चंद्रकांत जाधव, दिलीप खरुडे, बाळू जाधव, संजय शेटगे, एकनाथ खरुडे आदींच्या जंगलालगतच्या शेतात उतरून त्याने लावण उगवलेला ऊस व भात, तसेच रोपलावणीसाठीच्या भाताच्या आणि नागलीच्या तरव्यांचे मोठे नुकसान केले. तर गवसे येथील धनाजी हेबाळकर यांच्या शेतातील उसाचे आणि मोठ्या नारळाच्या झाडाचे नुकसान केले. खाणे कमी पण नुकसान जास्त अशी हत्तीची नीती असल्याने, तसेच खाद्य पुरेसे मिळाले नाहीतर शेतात ठेवलेली अवजारे उधळून मोडतोड करण्याचे त्याचे तंत्र अनाकलनीय असल्याने शेतकरी हैराण झाले आहेत.

वनविभाग तत्परतेने या परिसरात गस्त तसेच राखणीला असतो. पण त्यांनाही गुंगारा देत, तसेच हुसकावणे, वाद्ये वाजविणे व फटाके-सुरबाणासही हत्ती दाद न देता, नुकसान करीत आहे. आता पंधरवठ्यापूर्वी आणखी एक हत्ती आला असल्याची वनविभागाची माहिती आहे. पण त्यापैकी सध्या एकाचाच हैदोस सुरू असल्याने ही स्थिती आहे. जर दुसऱ्या हत्तीनेही नुकसान सुरू केल्यास शेतकऱ्यांची अवस्था बिकट होणार आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारे या दोन्ही हत्तींचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या