
इलॉन मस्क यांच्या टेस्ला कंपनीची इलेक्ट्रिक कार गुरुग्राममध्ये ड्रायव्हरविना पोहोचली. ही टेस्ला कार मॉडेल ‘वाय’ प्रकारातील आहे, जी पूर्ण स्वायत्त ड्रायव्हिंग क्षमतेने सुसज्ज आहे. ती कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित सेन्सर्स, कॅमेरे आणि रडार सिस्टमने सुसज्ज आहे, जे रस्त्यावर स्वयंचलित निर्णय घेतात. हिंदुस्थानी ग्राहकांना टेस्लाची कार आधी आयात करावी लागत होती, परंतु कंपनीने आता गुरुग्रामसह दिल्ली, मुंबई आणि पुण्यातील निवडक ग्राहकांसाठी घरपोच सेवा सुरू केली आहे. ही सेवा प्री-बुकिंगवर आधारित असेल, जिथे ग्राहक ऑनलाइन ऑर्डर करू शकतात आणि त्यांच्या घरी गाडी पोहोचवू शकतात. सध्या होम डिलिव्हरीमुळे ग्राहकांना सुविधा मिळेल आणि आयातीचा त्रास दूर होईल. टेस्लाच्या एन्ट्रीमुळे हिंदुस्थानात ईव्ही बाजारपेठेत स्पर्धा वाढणार आहे. टेस्लाच्या आधी टाटा मोटर्स, महिंद्रा आणि एमजी या ब्रँडच्या कार उपलब्ध आहेत.
किंमत किती?
कंपनीच्या अधिकृत इंडिया पोर्टलद्वारे किंवा मुंबई, दिल्ली आणि गुरुग्राममधील ऑम्बिअन्स मॉल्सना भेट देऊन बुकिंग करता येते. टेस्लाने हिंदुस्थानात फक्त मॉडेल ‘वाय’ लाँच केले आहे. या रियर-व्हील ड्राईव्ह प्रकाराची किंमत 59.89 लाख रुपये एक्स शोरूम आहे. याची रेंज 500 किमीपर्यंतची आहे, तर लाँग-रेंज मॉडेलची किंमत 67.89 लाख (एक्स-शोरूम) आहे. याची रेंज 622 किमीपर्यंतची आहे.





























































