
विद्यमान जुनियर विश्वविजेती नागपूरकर अल्फिया पठाणने कझाकिस्तानच्या नूर सुलतान येथे सुरू असलेल्या एलॉर्डा कप मुष्टियुद्ध स्पर्धेत शानदार यश मिळवले. अल्फियाने 81 किलो वजनी गटात 2016ची विश्वविजेती बॉक्सर लझ्झत कुंजयबायेव हिला 5-0 असे पराभूत करीत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले.
नागपूरकर अल्फियाने सीनियर आंतराष्ट्रीय स्पर्धेतील पदार्पण सार्थ ठरवणारी कामगिरी साकारली. तिने अनुभवी आशियाई चॅम्पियन कुंजयबायेवला आपल्या तुफानी पंचेसच्या वापराने डोके वर काढूच दिले नाही. अल्फियाच्या तुफानी खेळामुळे पंचांनी तिला 5-0 असा निर्विवाद विजय बहाल केला.
हिंदुस्थानी बॉक्सर्सची 14 पदकांची लयलूट
हिंदुस्थान, कझाकिस्तान, उझबेकिस्तान, क्युबा, चीन आणि मंगोलिया या बलाढय़ संघाचा सहभाग असलेल्या पहिल्याच एलॉर्डा कप बॉक्सिंग स्पर्धेत हिंदुस्थानच्या महिला आणि पुरुष मुष्ठयोद्धय़ांनी 14 पदकांची लयलूट केली. हिंदुस्थानी महिलांनी स्पर्धेत 2 सुवर्णपदके, 2 रौप्यपदक आणि 6 कास्यपदके पटकावली.



























































