वाढत्या कोरोनामुळे टोकियो ऑलिम्पिक संकटात; तीन महिनेआधी आणीबाणीची घोषणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनामुळे 2020 सालामध्ये आयोजित करण्यात येणारे टोकियो ऑलिम्पिक 2021 म्हणजेच या वर्षी ढकलण्यात आले. पण कोरोनाची आणखी एक लाट सध्या जगभरात सुरू असल्यामुळे यंदाचे टोकियो ऑलिम्पिकही संकटात सापडले आहे. या वर्षी 23 जुलै ते 8 ऑगस्ट या कालावधीत आयोजित करण्यात येणाऱया टोकियो ऑलिम्पिकच्या तीन महिने आधी जपानमध्ये कोरोनामुळे आणीबाणीची घोषणा करण्यात आली आहे.

जपानचे पंतप्रधान योशीहिदे सुगा यांनी यावेळी घोषणा करताना म्हटले की, वाढत्या कोरोनामुळे चार शहरांमध्ये आणीबाणी लागू करण्यात आली आहे. यामध्ये टोकियो, क्योतो, ओसाका व ह्य़ोगो या शहरांचा समावेश आहे. 25 एप्रिल ते 11 मे या कालावधीपर्यंत ही आणीबाणी असणार आहे. या आणीबाणीमुळे सध्या तरी जपानमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

रद्द करण्याचा विचार नाही

  टोकियो ऑलिम्पिक आयोजन समितीचे प्रमुख सिको हाशीमोटो यावेळी म्हणाले की, जपानमधील परिस्थितीचा विपरित परिणाम टोकियो ऑलिम्पिकच्या आयोजनावर होणार नाही. आम्ही जगातील प्रतिष्ठsचा क्रीडा महोत्सव रद्द करण्याचा विचार करीत नाही. जनतेच्या आरोग्याची काळजी घेत आम्ही पुढचे पाऊल टाकत आहोत.

परिणाम होतोय

  वाढत्या कोरोनाचा परिणाम जपानमध्ये दिसून येत आहे. ऑलिम्पिक पात्रता फेरी रद्द करण्यात आल्या आहेत. ऑस्ट्रेलियाच्या डायव्हिंग संघाने जपानमधील वर्ल्ड कपमधून माघार घेतलीय. जपानमध्ये लसीकरणाचा वेगही मंदावला आहे. याचा फटकाही त्यांना बसतोय. एकूणच काय सध्या तरी टोकियो ऑलिम्पिक आयोजन समितीकडून या क्रीडा महोत्सवाला हिरवा कंदील दाखवण्यात आला असला तरी प्रत्यक्षात हे ऑलिम्पिक होईल का, तसेच झाल्यानंतरही किती देशांतील खेळाडू यामध्ये सहभागी होतील, हाही प्रश्न यावेळी उभा ठाकला आहे.