इम्यॅनुएल मॅक्रॉन सलग दुसऱ्यांदा फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान, पंतप्रधान मोदींनी केलं अभिनंदन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

फ्रान्सचे (France) विद्यमान राष्ट्राध्यक्ष इम्यॅनुएल मॅक्रॉन (Emmanuel Macron) यांची दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्षपदी निवड झाली आहे. रविवारी पार पडलेल्या निवडणुकीमध्ये इम्यॅनुएल मॅक्रॉन यांना 58.2 टक्के मते मिळाली. इम्यॅनुएल मॅक्रॉन यांनी मरीन ले पेन (Marine Le Pen) यांचा पराभव केला. त्यांना 41.8 टक्के मते मिळाली.

फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी 12 जणांनी अर्ज दाखल केला होता. परंतु खरी लढत इम्यॅनुएल मॅक्रॉन आणि मरीन ले पेन यांच्यात होती. मॅक्रॉन यांना बाजी मारत दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्षपदावर विराजमान झाले. पाच वर्षांपूर्वी देखील मॅक्रॉन यांनी वयाच्या 39 व्या वर्षी मरीन ली पेन यांना मात देत पहिल्यांदा राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकली होती. फ्रान्सचा सर्वात युवा राष्ट्राध्यक्ष होण्याचा मान त्यांनी पटकावला होता.

दरम्यान, मरीन ले पेन यांनी पराभव स्वीकारला असून त्यांनी इमॅन्युअल मॅक्रोन यांना विजयाबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत. हा एक शानदार विजय असल्याचे मरीन ले पेन यांनी म्हटले.

मोदींनी केले अभिनंदन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रान्सचे नवनिर्वाचीत राष्ट्राध्यक्ष इम्यॅनुएल मॅक्रॉन यांचे ऐतिहासिक विजयाबद्दल अभिनंदन केले आहे. माझे मित्र इम्यॅनुएल मॅक्रॉन यांची फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षपदी पुन्हा निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन. हिंदुस्थान-फ्रान्स धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ करण्यासाठी एकत्र काम करण्यास मी उत्सुक असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटले.

बोरिस जॉन्सन यांच्याकडून अभिनंदन

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी इम्यॅनुएल मॅक्रॉन यांचे अभिनंदन केले आहे. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष म्हणून आपण पुन्हा विजयी झालात त्याबद्दल अभिनंदन, असे जॉन्सन यांनी लिहिले आहे. फ्रान्स आमचा सर्वात जवळचा आणि महत्त्वाचा सहकारी देश आहे. आपण दोन्ही देशांसाठी आणि जगासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या मुद्यावर एकत्रितपणे काम करु, असेही जॉन्सन यांनी म्हटले.

फ्रान्समध्ये जल्लोष

इम्यॅनुएल मॅक्रॉन यांच्या विजयानंतर त्यांच्या समर्थकांनी आयफेल टॉवर जल्लोष सुरू केला. आयफेल टॉवरमधील चँप डे मार्स पार्कमध्ये एका मोठ्या स्क्रीनवर अंतिम निकाल जाहीर करण्यात आला. यानंतर मॅक्रॉन समर्थकांनी जल्लोष केला आणि एकमेकांचं अभिनंदन केलं आहे. फ्रान्स आणि यूरोपियन यूनियनचे झेंडे घेऊन मॅक्रॉन यांच्या समर्थकांनी आनंद साजरा केला.