पीडितांचे सक्षमीकरण, आरोपींचेही समुपदेशन… लैंगिक अत्याचाराचे गुन्हे रोखण्यासाठी मोहीम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अनोळखी तसेच ओळखीच्या लोकांकडून अल्पवयीन मुली, तरुणी, महिलांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचारामुळे त्यांचे मानसिक खच्चीकरण होते. तो धक्का इतका जबरदस्त असतो की त्यातून बाहेर पडणे मग मुश्कील होऊन बसते. म्हणून अशा पीडितांसाठी मुंबई पोलिसांनी सक्षम मोहीम हाती घेतली आहे. तज्ञांच्या मदतीने पीडितांना त्या मानसिक धक्क्यातून बाहेर काढण्याबरोबर असे घाणेरडे कृत्य करणाऱ्यांचेदेखील ‘सक्षम’मध्ये समुपदेशन करण्यात येणार आहे.

कुठे न कुठे छेडछाड, विनयभंग, बलात्काराचे गुन्हे घडत असतात. या घटनांचा अल्पवयीन मुली, तरुणींच्या मनावर विपरीत परिणाम होतो. त्या धक्क्यातून बाहेर पडणे शक्य होत नाही. परिणामी तशा पीडितांचे मानसिक संतुलन ढासळते. हा गंभीर बाब लक्षात घेऊन मुंबई पोलिसांनी ‘सक्षम’ मोहीम हाती घेतली आहे. एम पॉवर संस्थेच्या माध्यमातून मानसोपचारतज्ञांच्या मदतीने अशा पीडितांना लैंगिक शोषणामुळे बसलेल्या धक्क्यातून बाहेर काढण्याचे काम केले जात आहे. पीडितांना मानसिक आधार देऊन पुन्हा सक्षम बनविण्याचे काम या मोहिमेतून करण्यात येत आहे. इतकेच नाही तर लैंगिक अत्याचाराचे गुन्हे करणाऱ्यांचेदेखील समुपदेशन करण्यात येणार आहे. शहरातील पाच ठिकाणी असलेल्या प्रादेशिक विभागात ‘सक्षम’ची कार्यालये असून या पाचही ठिकाणी एम पॉवरकडून मानसोपचारतज्ञांची नेमणूक करण्यात आली आहे. गेल्या महिनाभरात 25 प्रकरणे ‘सक्षम’च्या कार्यालयात आली होती. तब्बल 88 वेळा या सर्व प्रकरणांमध्ये समुपदेशन करण्यात आले.