एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांचा तडकाफडकी राजीनामा

21

सामना प्रतिनिधी । ठाणे

एन्काऊंटर स्पेशालिस्ट आणि ठाणे खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक प्रदीप शर्मा यांनी आपल्या सेवेचा तडकाफडकी राजीनामा दिला. शर्मा यांनी स्वेच्छा निवृत्तीसाठी अर्ज दिला असून त्यावर निर्णय येताच शर्मा कार्यभार सोडणार आहेत. शर्मा राजकारणात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा आहे.

मुंबईतील टोळीयुध्द मोडीत काढून गुन्हेगारी विश्वाचा बिमोड करणार्‍या प्रदीप शर्मा यांनी एन्काऊंटर करून 113 गुंडांना यमसदनी धाडले होते. ‘सुपरकाॅप’ अशी ओळख असलेल्या शर्मा यांनी 2017 साली ठाण्याच्या खंडणी विरोधी पथकाचा कार्यभार स्वीकारला होता. त्यानंतर शर्मा यांनी कुख्यात डाॅन दाऊद इब्राहिम याचा भाऊ इक्बाल कासकर याच्या एका खंडणी प्रकरणात मुसक्या आवळून अंडरवल्डच्या गुन्हेगारी विश्वाचे कंबरडे मोडले होते. त्यामुळे शर्मा यांच्या राजीनाम्याने पोलीस दलात खळबळ माजली आहे. शर्मा यांनी 4 जुलै रोजी वैयक्तिक कारणासाठी स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज केला असून लवकरच ते कार्यभार सोडणार आहेत.