
जम्मू- कश्मीरच्या श्रीनगरमध्ये रविवारी सकाळी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाने तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. श्रीनगर येथील जूनिमर पोजवालपोरा या भागात दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. सुरक्षा दलाने जम्मू-कश्मीर पोलिसांसह परिसरात शोधमोहीम सुरू केली. दहशतवादी लपलेल्या भागाला घेरावा टाकण्यात आला. सुरक्षा दलाचे जवान दिसताच दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. जवानांनी प्रत्युत्तरादाखल कारवाई करत तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला. परिसरात आणखी काही दहशतवादी लपल्याची शक्यता असल्याने त्यांना शोधण्यासाठी सुरक्षा दलाने शोधमोहीम हाती घेतली आहे. तसेच सुरक्षेसाठी शहरातील इंटरनेट सेवा खंडित करण्यात आली आहे. सुरक्षा दलाने 24 तासात 4 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. शनिवारी एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला होता.
या शोधमोहिमेत सीआरपीएफचे शीघ्र कृती दल, सीआरपीएफची 115 आणि 28 वी बटालियन आणि जम्मू-कश्मीर पोलीस सहभागी झाले होते. दहशतवादी लपलेल्या ठिकाणी सुरक्षा दलाने घेराव टाकला. दहशतवाद्यांची ओळख पटल्यानंतर त्यांच्या पालकांना बोलावण्यात आले. या पालकांनी आपल्या मुलांना शरण येण्याचे आवाहन केले. मात्र, दहशतवाद्यांनी शरण येण्यास नकार दिला. त्यामुळे सुरक्षा दलाला कारवाई करावी लागल्याचे पोलिसांनी सांगितले. सुरक्षा दलाने खात्मा केलेल्या दहशतवाद्यांपैकी दोनजण 2019 पासून दहशतवादी कारवायांमध्ये सक्रीय होते.





















































