
सामना प्रतिनिधी । हडोळती
हडोळती (ता.अहमदपूर) येथे मोठी बाजारपेठ असून आसपासच्या २० ते २५ गावांचा संपर्क या गावाशी जोडला जातो. महाविद्यालयीन, जिल्हा परिषद शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र, कपडा खरेदी, कृषी साहीत्य, शालेय शिक्षणासाठी परिसरातील नागरिकांना हडोळती येथे यावे लागते पण येथील बस थांब्यावर उभे राहायला ही जागा नाही. त्यामुळे प्रवाशांची तसेच शालेय विद्यार्थांची प्रचंड गैरसोय होत आहे.
पूर्वी येथील बस थांब्यावर थांबण्यासाठी एक बसशेड होते परंतु येथील हॉटेल व्यावसायिकांनी त्या ठिकाणी चूल मांडल्याने हे शेड गायब झाले आहे. येथे उभे राहायलाही जागा नाही. प्रवाशांची व बाहेर गावाहून शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना बसण्यासाठी जागा नाही. शौचालय नाही, पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था नाही, पावसाळ्याचे दिवस असल्याने थांबण्यासाठी जागा नाही.
अवैध वाहतुक करणाऱ्या गाड्या उभ्या केल्या जात असल्यामुळे वाहतुकीची कोंडी झालेली दिसते. हा राज्य महामार्ग असल्यामुळे येथे प्रचंड रहदारी असते. बस थांब्यावर अवैध वाहतुक करणारे ट्रॅव्हल्स थांबलेले असतात. एक तर या थांब्यावर दुतर्फी दुकानांचे गाळे आहेत. त्यातच खासगी ट्रॅव्हल्स बुकींगवाले येथे लक्झरी थांबवून ठेवत असल्यामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण होते व खरेदीसाठी बाहेर पडणाऱ्या नागरीकांना महिलांना या वाहतुककोंडीचा त्रास होतो. या बुकींगवाल्यांची गावाच्या बाहेर व्यवस्था करावी, अशी मागणी नागरीक करत आहेत.





























































