जोगेश्वरीच्या श्यामनगर तलावाची मोकळी जागा अतिक्रमणाच्या विळख्यात, गणेशभक्तांमध्ये संतापाची लाट

गणेशोत्सवामध्ये सर्वत्र खड्डे बुजविण्याचे काम सुरू असताना जोगेश्वरी पूर्व श्यामनगर तलावाच्या आसपास मात्र खड्डे पाडण्याचे काम सुरू आहे. या खड्ड्यांमुळे तलावावर विसर्जनासाठी येणाऱ्या गणेशभक्तांची मोठी गैरसोय होत आहे. गणेशोत्सवाच्या आडून जागा बळकवण्याचा हा डाव आहे का, असा संतप्त सवाल जोगेश्वरीकरांनी उपस्थित केला आहे.

जोगेश्वरी पूर्व लोकमान्य गणेश विसर्जन तलाव, शाम नगर येथे हजारो गणेशमूर्तींचे विसर्जन होत असते. विसर्जना वेळी गणेशाची निरोपाची आरती इच्छापूर्ती गणेश मंदिराच्या प्रांगणात होत असते. नेमक्या याच ठिकाणी मोठमोठे खड्डे पाडण्यात आले आहेत. या खड्ड्यांमध्ये अनेक गणेशभक्त अडकून पडण्याच्या घटना घडतायत. आरतीसाठी मूर्ती घेऊन जातानादेखील मोठी कसरत करावी लागतेय. तलावाच्या परिसरात खड्डे कोणी पाडले, याबाबत म्हाडा झोपडपट्टी सुधार मंडळ आणि पालिकेकडे चौकशी केली असता याबाबत आपल्याला काही माहीत नसल्याचे सांगून ते आपली जबाबदारी झटकत आहेत. मग गणेशोत्सवाच्या आडून ही जागा बळकवण्याचा डाव आहे का, असा सवाल स्थानिकांनी उपस्थित केला आहे. महापालिकेचा मोठा अधिकारी वर्ग बाजूलाच कार्यरत असतानादेखील या खड्ड्यांकडे पालिकेने जाणीवपूर्वक डोळेझाक केल्याचेही स्थानिकांचे म्हणणे आहे.