
प्रत्येक खेळाडूच्या मनात एकच स्वप्न असतं कारकीर्दीचा शेवट देशाच्या विजयाने व्हावा, हातात ध्वज, चेहऱयावर समाधान आणि मनात अभिमान. पण नियतीला भावनांचा अर्थ फारसा कळत नाही. न्यूझीलंडच्या महिला क्रिकेट संघाची कर्णधार सोफी डेव्हिन हिच्यासोबतही तसंच घडलं. 15 वर्षांच्या झुंजार, प्रेरणादायी आणि सातत्यपूर्ण कारकीर्दीच्या अखेरच्या एकदिवसीय सामन्यात तिने देशासाठी विजयाचं स्वप्न उराशी बाळगलं होतं. परंतु विश्वचषकातील अखेरच्या लढतीत इंग्लंडने न्यूझीलंडचा पराभव करून तिचं स्वप्न भंग केलं.
इंग्लंडने आठ विकेट राखून सहज विजय मिळवत डेव्हिनच्या अध्यायाला भावनिक शेवट दिला. सामन्याच्या सुरुवातीला डेव्हिनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जणू अखेरच्या दिवशी स्वतःचं भाग्य स्वतः लिहायचं ठरवलं होतं. पण तिच्या संघाचा डाव 38.2 षटकांत फक्त 168 धावांवर कोसळला.
जॉर्जिया प्लिमर (43 धावा) आणि अमेलिया केर (35 ) यांनी दुसऱया गडीसाठी 68 धावांची भागीदारी करत संघाला थोडा आधार दिला, मात्र इंग्लंडच्या फिरकीपटूंनी मधली रांग उद्ध्वस्त केली आणि सामना खेचून घेतला.
डेव्हिनने आपल्या शेवटच्या सामन्यात 35 चेंडूंत 23 धावा केल्या. संयमी, पण अपूर्ण डाव.
ती बाद झाल्यानंतर मैदानावर एक भावनिक क्षण पाहायला मिळाला. इंग्लंड आणि न्यूझीलंडच्या दोन्ही संघांनी तिचं टाळय़ांनी स्वागत केलं. प्रतिस्पर्ध्यांच्या नजरेतही आदर होता, कारण समोर उभी होती अशी कर्णधार, जिचं आयुष्य खेळासाठीच होतं, फक्त विजयासाठी नव्हे.
इंग्लंडचा विजय – एमी जोन्सचा दर्जेदार खेळ
169 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडने केवळ दोन गडी गमावले आणि 172 धावांपर्यंत सहज मजल मारली. एमी जोन्सने 92 चेंडूंत नाबाद 86 धावांची झळाळती खेळी करत विजयाचा पाया रचला. तिने टॅमी ब्यूमाँट (40 धावा) सोबत 75 धावांची सलामी भागीदारी आणि हिदर नाईट (33 धावा) सोबत 83 धावांची भागीदारी करत इंग्लंडचा विजय
निश्चित केला.
आता उपांत्य फेरीत इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका
या विजयामुळे इंग्लंडने 11 गुणांसह दुसरं स्थान मिळवलं असून आता 29 ऑक्टोबर रोजी उपांत्य फेरीत इंग्लंडचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे. न्यूझीलंडचा प्रवास मात्र 4 गुणांसह सहाव्या स्थानावरच थांबला. आणि या सामन्यासह संपली सोफी डेव्हिनची तेजस्वी, 15 वर्षांची एकदिवसीय कारकीर्द.

























































