भाजपवाले धुतल्या तांदळासारखे आहेत का? ‘ईडी’च्या कारवायांवरून हसन मुश्रीफ यांचा संतप्त सवाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘राज्यात भाजपची सत्ता न आल्याने केंद्रीय यंत्रणांच्या माध्यमातून कारवाया सुरू आहेत. केवळ महाविकास आघाडीच्याच नेत्यांवर ‘ईडी’च्या कारवाया होत असून, भाजपवाले धुतल्या तांदळासारखे आहेत का?’ असा सवाल ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. दरम्यान, ‘राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेले विधान अत्यंत चुकीचे असून, त्यांनी ते विधान तत्काळ मागे घेऊन जनतेची माफी मागावी,’ अशी मागणीही त्यांनी केली.

नगर जिह्याची आढावा बैठक झाल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आमदार आशुतोष काळे, जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री घुले, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, मनपा आयुक्त शंकर गोरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर आदी उपस्थित होते.

मंत्री मुश्रीफ म्हणाले, ‘राज्यात केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर सुरू आहे. अनेकदा हे सिद्ध झाले आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून ईडीमार्फत अशा कारवाया केल्या जात आहेत. मंत्री नवाब मलिकांवर जमिनीच्या खरेदीवरून आरोप होत आहेत. मलिक यांनी 25 वर्षांपूर्वी ही जमीन खरेदी केली होती. सात वर्षांपासून केंद्रात सरकार आहे; पाच वर्षे राज्यात सत्तेत होते, तेव्हा भाजपवाल्यांना हा गैरव्यवहार दिसला नाही का? केवळ राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यामुळे अशा प्रकारच्या कारवाया केल्या जात आहेत. मात्र, महाविकास आघाडीचे सरकार फेव्हिकॉलसारखे घट्ट आहे. आता अशा प्रकारच्या कारवायांमुळे ते अधिक घट्ट होत आहे,’ असेही ते म्हणाले.

‘ओबीसींच्या आरक्षणाची सुनावणी पूर्ण झाल्यानंतरच निवडणुकीच्या प्रक्रियेला प्रारंभ होईल. तसेच 21 मार्चनंतर राज्यातील मुदत संपणाऱया जिल्हा परिषदांवर मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशासक म्हणून राहतील. नगर शहरातील रस्त्यांची दुरवस्था झालेली आहे. त्याबाबत मनपा आयुक्तांना सूचना दिल्या आहेत. महापालिकेला वेगवेगळ्या माध्यमांतून 26 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. यामध्ये बाळासाहेब देशपांडे रुग्णालयासाठीही 11 कोटी दिले असून, शहरातील रस्त्यांसाठी 15 कोटी दिल्याचेही ते म्हणाले. नगर जिह्यातील 27 मुले युक्रेनमध्ये होती. त्यांतील दोघे परत आले आहेत. आज आणखी चार विमाने गेली आहेत. त्यातून किती जण येतात, हे नंतर स्पष्ट होईल,’ असेही मंत्री मुश्रीफ म्हणाले.

नियती व काळ बघत असतो; अति झाल्यावर माती होणारच!

‘आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. या निवडणुकांत स्थानिक पातळीवर आघाडी करायची की नाही, हा निर्णय घ्यावा; पण भाजपसोबत कोणीही जाणार नाही, याची खबरदारी घ्या,’ असा सल्ला पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी जिह्यातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱयांना दिला. ‘महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्याच्या पहिल्या दिवसापासून सत्ता गमावल्याचा पोटशूळ उठल्यामुळे विरोधी पक्ष राज्यातील सरकार जाण्यासाठी देव पाण्यात घालून बसला आहे. त्यातूनच केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून महाविकास आघाडीच्या नेत्यांवर कारवाया करण्यात येत आहेत. असे असले, तरी नियती व काळ बघत असतो. अति झाले की माती होणारच,’ असे टीकास्त्र हसन मुश्रीफ यांनी सोडले.