जयंत पाटील यांची 9 तास ईडी चौकशी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आज ईडी चौकशीला सामोरे गेले. दुपारी सक्वा बाराच्या सुमारास ईडीच्या मुंबईतील कार्यालयात पोहचले. त्यानंतर तब्बल 9 तास पाटील यांची चौकशी करण्यात आली. दरम्यान, ईडी आणि केंद्रातील भाजप सरकारविरोधात आक्रमक होत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. राज्यभरात तीव्र निदर्शने करण्यात आली. ईडी कार्यालयाबाहेरही मोठय़ा संख्येने संतप्त कार्यकर्ते जमा झाले होते. यात ‘वातावरण फिरलंय, भाजप घाबरलंय’ हा फलक लक्ष वेधून घेत होता.

आयएल अँड एफएस कर्ज प्रकरणी जयंत पाटील यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आले होते. दुसऱया समन्सनंतर पाटील आज चौकशीसाठी हजर झाले. ईडीच्या तीन अधिकाऱयांनी पाटील यांची चौकशी केल्याचे सांगण्यात येत आहे. 9 तासांच्या चौकशीनंतर जयंत पाटील रात्री सक्वानऊच्या सुमारास ईडी कार्यालयातून हसतमुखाने बाहेर पडले. तिथे कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. जल्लोषात पाटील यांचे स्वागत करण्यात आले.

चौकशीला पूर्ण सहकार्य

चौकशीसाठी मी ईडीला पूर्णपणे सहकार्य करणार असल्याचे आज सकाळी चौकशीला जाण्याआधीच जयंत पाटील यांनी नमूद केले. माझा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही. मी आयएल अॅण्ड एफएसकडून कोणतेही कर्ज घेतले नव्हते, असेही पाटील यांनी पुन्हा स्पष्ट केले. कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचे आवाहनही त्यांनी केले.

राष्ट्रवादीचे राज्यभरात आंदोलन

जयंत पाटील यांच्या ईडी चौकशीवरून राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. कारवाईविरोधात राज्यभरात आंदोलन करण्यात आले. मुंबईत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आंदोलनासाठी रस्त्यावर उतरले. मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर घोषणाबाजी करण्यात आली तसेच ईडी कार्यालयाबाहेरही निदर्शने करण्यात आली. सांगली जिह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मुंबई दाखल झाले. इस्लामपूर, सांगली येथेही ईडी आणि भाजप विरोधात तीव्र आंदोलन करण्यात आले. पुण्यातही तीव्र निदर्शने करण्यात आली.

सोबत होती दोन पुस्तके

जे काही असेल त्याला समोरे जाणे हे आपले काम आहे. मला फक्त चौकशीसाठी बोलावले. माझ्यावर कोणताही दबाव नाही, अशी प्रतिक्रिया पाटील यांनी दिली. माझ्याकडे काही नाही, त्यामुळे मी दोन पुस्तके वाचायला घेऊन चाललो आहे, असे ते म्हणाले. पुस्तकं घेऊन चालला आहात म्हणजे तुम्ही मुक्कामाच्या दृष्टीने चालला आहात का? असा प्रश्न पाटील यांना विचारला असता मुक्कामासाठी नाही, ईडीला सहकार्य करण्यासाठी मी चाललो आहे, असे पाटील म्हणाले.

ईडीकडे आता कुठलेही प्रश्न शिल्लक नसतील. सगळय़ा प्रश्नांची समाधानकारक उत्तरे मी दिली आहेत. ईडी कार्यालयात बसून अर्धे पुस्तक वाचून झाले. – जयंत पाटील