संपूर्ण देशात प्रसिद्ध राजमल लखीचंद सराफ पेढीवर ईडीची धाड; तब्बल 36 तास कागदपत्रांची झाडाझडती

संपूर्ण देशात सोन्याच्या खरेदीसाठी विश्वासपात्र सराफा पेढी म्हणून ओळखल्या जाणाऱया जळगावातील राजमल लखीचंद सराफा पेढीवर ईडीने धाड टाकली. जळगाव आणि नाशिकमधील सहा फर्मवर एकाच वेळी छापेमारी करून तब्बल 36 तास कागदपत्रांची झाडाझडती घेण्यात आली. या धाडसत्रामुळे संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे.

जळगावातील राजमल लखीचंद सराफा पेढीवर सोने, चांदीच्या खरेदीसाठी देशभरातून ग्राहक येतात. या सराफा पेढीला शतकी परंपरा आहे. गुरुवारी सकाळी राजमल लखीचंद पेढीच्या जळगाव आणि नाशिकमधील सहा फर्मवर ईडीने एकाच वेळी धाड टाकली. यात जळगावातील आर. एल. ज्वेलर्स, मानराज आणि नेक्सा शोरूमचा समावेश आहे. मुंबई, नागपूर तसेच छत्रपती संभाजीनगरातून ईडीच्या 10 गाडय़ा शहरात आल्या. यात 60 अधिकाऱयांचा समावेश होता.

ईडीचे पथक दाखल होताच सराफा पेढीत ग्राहकांना प्रवेश नाकारण्यात आला. पेढीतील कर्मचाऱयांना थांबवून ठेवण्यात आले. त्यांचे मोबाईलही काढून घेण्यात आले. जे कर्मचारी बाहेर होते, त्यांनाही आत प्रवेश देण्यात आला नाही. सकाळपासून कागदपत्रांची सुरू झालेली झाडाझडती शुक्रवारी उशिरापर्यंत चालू होती. प्राप्तीकर खात्याचे पथकही या चौकशीत सहभागी झाले होते.

राजमल लखीचंद सराफा पेढीने स्टेट बँकेकडून घेतलेल्या 600 कोटी रुपयांच्या थकीत कर्ज प्रकरणात ही चौकशी असल्याची माहिती सूत्रांनी दिली. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये सीबीआयनेही राजमल लखीचंद सराफा पेढीची चौकशी केली होती.

ईडीच्या कारवाईला राजकीय वास
राजमल लखीचंद सराफा पेढीचे मालक ईश्वर जैन हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निकट वर्तुळातील आहेत. माजी खासदार असलेले ईश्वर जैन हे 15 वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसचे कोषाध्यक्ष होते. राष्ट्रवादीत झालेल्या बंडखोरीनंतर ईश्वर जैन हे शरद पवारांच्या पाठीशी खंबीर उभे राहिले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आर्थिक स्त्र्ााsतांची झाडाझडती घेण्यासाठीच हे धाडसत्र असल्याची चर्चा होत आहे.