
सामना ऑनलाईन, ट्रेंटब्रिज
ट्रेंट ब्रिजच्या तिसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी आज अष्टपैलू हार्दिक पांड्याचे तांडव इंग्लिश फलंदाजांना अनुभवावे लागले.पांड्याने कसोटी कारकिर्दीत प्रथमच ५ विकेट पटकावण्याचा भीमपराक्रम नोंदवला. त्यामुळेच कसोटी मालिकेत २-० अशी आघाडी मिळवणाऱ्या यजमान इंग्लंडचा पहिला डाव ३८.२ षटकांत १६१ धावांतच गडगडला. पांड्याने ६ षटकांत फक्त २८ धावा मोजत इंग्लंडच्या ५ फलंदाजांना तंबूत धाडले. पहिल्या डावाच्या आधारे १६८ धावांची आघाडी घेत हिंदुस्थानने प्रथमच या मालिकेत यजमानाने संघाला संकटात टाकले आहे .
इंग्लंडच्या फलंदाजांनी आज हिंदुस्थानी वेगवान गोलंदाजांपुढे पार नांगी टाकली. जसप्रीत बुमराह आणि इशांत शर्माने इंग्लंडच्या डावाला आरंभालाच खिंडार पाडले. त्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रेंटब्रिजच्या खेळपट्टीवर अफलातून वेगवान मारा करीत ५ विकेट मिळवण्याचा पराक्रम केला.इंग्लंडच्या वतीने जोस बटलर (३२ चेंडूंत ३९ ) आणि अलिस्टर कूक (४२ चेंडूंत २९ ) या दोघांवाव्यतिरिक्त अन्य इंग्लिश फलंदाज पार अपयशी ठरले. पांड्याला उत्तम साथ देत जसप्रीत बुमराह (३७ धावांत २ विकेट) आणि इशांत शर्मा ( ३२ धावांत २ विकेट ) यांनीही चमकदार कामगिरी नोंदवली





























































