डोक्याला हेडॅक, इंग्लंडहून आलेला नागपुरातील रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ब्रिटनमध्ये आढळलेल्या कोरोना व्हायरसच्या नव्या स्ट्रेनचा संसर्ग देशात होऊ नये यासाठी सर्व यंत्रणा सतर्क असतानाच नागपुरात एक तरुण पॉझिटिव्ह आढळला आहे. ब्रिटनमधून आलेल्या या तरुणाला नव्या स्ट्रेनचा संसर्ग आहे का ? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्याचा चाचणी अहवाल पुण्यातील ‘एनआयव्ही’ येथे पाठविण्यात आला आहे. दरम्यान, गोव्यात आलेल्या ब्रिटन आणि आखाती देशांतील 602 पर्यटकांचा शोध सुरू आहे. यामुळे 2020 संपताना ब्रिटनमधील नव्या कोरोनाचा डोक्याला हेडॅक झाला आहे.

ब्रिटनमध्ये सार्स-कोविड-2 या नवीन कोरोना स्ट्रेनचा संसर्ग वाढताच हिंदुस्थानने ब्रिटनची विमान वाहतूक स्थगिती करण्याची घोषणा सोमवारी केली. बुधवारी मध्यरात्रीपासून 31 डिसेंबरपर्यंत ब्रिटनची विमानसेवा बंद राहणार आहे. मात्र नागपुरात कोरोना पॉझिटिव्ह सापडलेला 28 वर्षीय तरुण डिसेंबरच्या पहिल्या आठवडय़ात ब्रिटनहून आला होता. त्याला त्रास होऊ लागल्याने 14 डिसेंबरला चाचणी केली. तो पॉझिटिव्ह आढळला असे नागपूर महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार यांनी सांगितले. तरुणाची प्रकृती स्थिर आहे. त्याच्या घरातील चारजणांना क्वारंटाइन करण्यात आले आहे.

गोव्यात ऍलर्ट

नाताळ आणि थर्टी फर्स्टसाठी गोव्यात देशविदेशातील पर्यटकांची मोठी गर्दी असते. या वर्षी बुधवारपासून 31 डिसेंबरपर्यंत ब्रिटनहून येणारी विमानसेवा बंद केली असली तरी यापूर्वीही विदेशी पर्यटक गोव्यात आले आहेत.

9 डिसेंबरपासून ब्रिटन आणि आखाती देशांमधून 602 पर्यटक गोव्यात आले. पणजी आणि इतर भागात हे पर्यटक राहत आहेत. त्यांचा शोध अद्याप लागलेला नाही.

विदेशी पर्यटकांचा शोध घेऊन त्यांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. आरोग्य आणि प्रशासकीय यंत्रणा ऍलर्ट ठेवली आहे.

चाचणीचे नमुने ‘एनआयव्ही’ला पाठविले

या तरुणाला झालेला कोरोनाचा संसर्ग कोणता आहे? कोरोना व्हायरसच्या नवीन स्ट्रेनची लागण झाली आहे का? याचा शोध घेण्यासाठी त्याच्या चाचणीचे नमुने पुण्यातील नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ व्हायरॉलॉजी (एनआयव्ही) येथे पाठविण्यात आले आहेत.

दिल्ली विमानतळावरून पाच कोरोना पॉझिटिव्ह फरार

ब्रिटनहून येणारी विमानसेवा बुधवारपासून बंद केली आहे. तत्पूर्वी, सर्व प्रवाशांची विमानतळावर तपासणी करण्यात आली. त्यातील ब्रिटनहून दिल्ली विमानतळावर उतरलेले पाच कोरोना पॉझिटिव्ह प्रवासी फरार झाले. पोलिसांच्या मदतीने शोध सुरू केला. तीन जणांना शोधून दिल्लीतील  रुग्णालयात दाखल केले. एक कोरोनाबाधित पंजाबमधील लुधियानाचा तर दुसरा आंध्र प्रदेशात पळून गेला आहे. संबंधित राज्य सरकारांना माहिती दिली आहे.