देशातील इंजिनीयरिंग कॉलेजेस् 1 नोव्हेंबरपासून सुरू होणार, एआयसीटीईने दिले निर्देश

प्रातिनिधीक फोटो

देशातील अभियांत्रिकी (इंजिनीयरिंग) महाविद्यालये 1 नोव्हेंबरपासून सुरू करावीत असे निर्देश अखिल भारतीय तंत्रशिक्षण संस्थेने (एआयसीटीई) देशातील तंत्रशिक्षण संस्थांना दिले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तंत्रशिक्षण संस्थांचे शैक्षणिक वर्ष सुरू होण्यास विलंब झाला आहे.

इंजिनीयरिंगच्या प्रथम वर्षासाठीची प्रवेश प्रक्रिया 31 ऑक्टोबरलाच पूर्ण झाली आहे. परंतु कोरोना संकटाचा विचार करून आयआयटी आणि एनआयटी संस्थांमधील पदवीपूर्व आणि डिप्लोमा अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे असे एआयसीटीईचे सचिव राजीव कुमार यांनी सांगितले.

एआयसीटीईच्या नव्या वेळापत्रकानुसार 1 नोव्हेंबरपासून नव्या शैक्षणिक वर्षाला सुरूवात होणार आहे. सुरक्षेचा विचार करून इंजिनियरींगचे वर्ग ऑनलाईन, ऑफलाईन किंवा प्रत्यक्ष असे कसेही सुरू करता येतील असेही एआयसीटीईने स्पष्ट केले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सूचनेवरून वेळापत्रकात बदलही केले जाऊ शकतात असेही एआयसीटीईने स्पष्ट केले आहे.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे केंद्र सरकारने 16 मार्चपासून लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर देशातील शाळा व महाविद्यालये बंद आहेत. विद्यापीठ अनुदान आयोगानेहे (यूजीसी) महाविद्यालयांचे सत्र 1 नोव्हेंबरपासून सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. अभ्यासक्रम वेळत पूर्ण व्हावा यासाठी काही सुट्ट्या रद्द केल्या जाणार आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या