
अभियांत्रिकीसह सर्व तांत्रिक अभ्यासक्रमाचे शिक्षण आता मातृभाषेत घेता येणार आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने हा निर्णय घेतला असून त्याची अंमलबजावणी पुढच्या शैक्षणिक सत्रापासून होणार आहे.
केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री रमेशचंद्र पोखरियाल निशंक यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक झाली. या बैठकीत अभियांत्रिकीसह सर्व तांत्रिक अभ्यासक्रमाचे शिक्षण मातृभाषेतून उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी मंत्रालयाने काही आयआयटी, एनआयटीची यादीही बनवली आहे. ‘जेईई’, ‘नीट’ परीक्षा घेणाऱ्या राष्ट्रीय परीक्षा एजन्सी अर्थात एनटीएलाही स्पर्धा परीक्षेचा अभ्यासक्रम तयार करण्याची सूचना या बैठकीत देण्यात आली. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वेळेवर देण्यात यावी असे स्पष्ट निर्देशही यूजीसीला देण्यात आले.
एनटीएने गेल्या महिन्यातच 2021 पासून हिंदी आणि इंग्रजीशिवाय नऊ प्रादेशिक भाषांमधून जेईईची परीक्षा घेण्याची घोषणा केली होती, मात्र आयआयटीने यासंदर्भात अजून कोणताही निर्णय घेतलेला नाही. आयआयटी व एनआयटीने निर्णय घेतल्यानंतरच हा निर्णय अंतिम समजण्यात येईल.


























































