
हिंदुस्थानचे दोन्ही क्रिकेट संघ एकत्रितपणे इंग्लंडला रवाना होणार आहेत. हिंदुस्थानचा पुरुषांचा संघ इंग्लंडमध्ये सहा कसोटी तर हिंदुस्थानचा महिलांचा संघ एक कसोटी, तीन टी-20 व तीन वन डे सामने खेळणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही संघांना चार्टर्ड विमानाने इंग्लंडमध्ये पाठवण्याची तयारी बीसीसीआय करीत आहे.
15 वर्षांनंतर ऑस्ट्रेलियात कसोटी खेळणार
हिंदुस्थानचा महिला संघ येत्या सप्टेंबर महिन्यात ऑस्ट्रेलियात कसोटी सामना खेळणार आहे. दोन्ही बोर्डांकडून याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही; पण हा कसोटी सामना खेळवण्यात आल्यास तब्बल 15 वर्षांनंतर हिंदुस्थानचा महिला संघ ऑस्ट्रेलियात कसोटी सामना खेळेल. या दौऱयात हिंदुस्थानचा संघ कसोटीसोबतच तीन वन डे व तीन टी-20 सामन्यांची मालिकाही खेळणार आहे.
माजी क्रिकेटपटू शिवसुंदर दास फलंदाजी प्रशिक्षक
हिंदुस्थानचा माजी सलामी फलंदाज शिवसुंदर दास याची हिंदुस्थानी महिला संघाच्या फलंदाजी प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे. रमेश पोवार या संघाचे मुख्य प्रशिक्षक आहेत. प्रशिक्षण स्टाफमध्ये नऊ सदस्यांचा समावेश आहे. शिवसुंदर दास याने याआधी हिंदुस्थानी ‘महिला अ’ संघासोबत काम केले आहे. तसेच शिवसुंदर दास याची फक्त इंग्लंडमधील मालिकेसाठीच निवड करण्यात आली आहे.
विराट अॅण्ड कंपनीला दुसरा डोस यूकेमध्ये मिळणार
हिंदुस्थानी संघातील बहुतांशी खेळाडूंनी इंग्लंडला रवाना होण्याआधी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे. या खेळाडूंना दुसरा डोस इंग्लंडमध्ये मिळावा अशी मागणी बीसीसीआयकडून इंग्लंड अॅण्ड वेल्स क्रिकेट बोर्डाला करण्यात आली होती. अखेर यूकेमधील आरोग्य विभागाकडून हिंदुस्थानी खेळाडूंच्या दुसऱया डोसची हमी देण्यात आली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या निगराणीखाली हा डोस खेळाडूंना देण्यात येणार आहे.































































