इंग्लंडच्या क्रिकेटपटूंचा आयपीएलला रामराम, ईसीबीच्या अॅश्ले जाईल्स यांनी केले स्पष्ट

बीसीसीआय व आयपीएल गव्हर्निंग समितीला मंगळवारी जोरदार धक्का बसला. इंग्लंड अॅण्ड वेल्स क्रिकेट बोर्डाचे (ईसीबी) डायरेक्टर अॅश्ले जाईल्स यांनी स्पष्ट मत व्यक्त करताना म्हटले की, इंग्लंडचा संघ आगामी काळात प्रचंड क्रिकेट खेळणार आहे. धकाधकीच्या वेळापत्रकाचा आम्हाला सामना करावयाचा आहे. त्यामुळे आयपीएलच्या उर्वरित लढतींमध्ये इंग्लंडच्या क्रिकेटपटूंना सहभागी होता येणार नाही. आयपीएल स्पर्धेत खेळण्यासाठी इंग्लंडच्या खेळाडूंना ना हरकत प्रमाणपत्र देण्यात येणार नाही. अॅश्ले जाईल्स यांच्या वक्तव्यानंतर बीसीसीआय कोणते पाऊल उचलते हे पाहणे रंजक ठरणार आहे.

पुढील चार महिने बिझी

इंग्लंडचा संघ पुढील चार महिने बिझी असणार आहे. सुरुवातीला न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिकेत इंग्लंडला खेळावे लागणार आहे. त्यानंतर इंग्लंड-श्रीलंका यांच्यामध्ये वन डे मालिका होणार आहे. हिंदुस्थान-इंग्लंड यांच्यामध्ये पाच कसोटी सामन्यांची मालिका पार पडल्यानंतर अॅशेस व टी-20 वर्ल्ड कप या दोन महत्त्वाच्या स्पर्धांमध्येही त्यांना सहभागी व्हायचे आहे. या सर्व स्पर्धांसाठी खेळाडू फिट राहावेत यासाठी इंग्लंडच्या क्रिकेटपटूंना आयपीएलपासून दूर ठेवण्यात येणार आहे.

या संघांना होणार नुकसान

इंग्लंडच्या क्रिकेटपटूंच्या अनुपस्थितीमुळे आयपीएलमधील काही संघांना नुकसान होणार आहे. राजस्थान रॉयल्स संघामध्ये जोफ्रा आर्चर, जोस बटलर व बेन स्टोक्स हे महत्त्वाचे खेळाडू आहेत. यामुळे त्यांना मोठा धक्का बसला असेल यात शंका नाही. चेन्नई सुपरकिंग्ज संघात सॅम करण आहे. सनरायझर्स हैदराबादमध्ये जॉनी बेअरस्टोचा समावेश आहे. कोलकाता नाईट रायडर्स संघाचे नेतृत्व ओएन मॉर्गनकडे आहे. याशिवाय टॉम करण (दिल्ली कॅपिटल्स), डेव्हिड मलान (पंजाब किंग्ज) व जेसन रॉय (सनरायझर्स हैदराबाद) हेही खेळाडू आयपीएलमधील विविध संघांमधून खेळत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या