England vs India : इंग्लंडचा पहिला डाव 161धावात आटोपला; पंड्याने टिपले पाच गडी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । लंडन

हिंदुस्थान आणि इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडची अवस्था बिकट झाली आहे. या सामन्यात पंड्याने चमकदार खेळी करत इंग्लंडच्या पाच फलंदाजांना तंबूत धाडले. आज सामन्याचा दुसऱ्या दिवशी उपहारापर्यंत इंग्लंडने संयमी खेळ करत बिनबाद ४६ धावांपर्यंत मजल मारली. कूक आणि जेनिंग्स जोडीने हिंदुस्थानी गोलंदाजांचे आक्रमण परतावून लावत अर्धशतकाकडे वाटचाल केली. उपहारानंतर कूक (२९) आणि जेनिंग्स (२०) दोघेही बाद झाले. त्यानंतर इंग्लंडचा डाव सावरत असताना नवोदित ओली पोप बाद झाला. ऋषभ पंत याने त्याचा झेल टिपला. इशांत शर्माने त्याला बाद केले. त्या नंतर हार्दिक पंड्याच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडच्या फलंदाज तग धरू शकले नाहीत. जो रूट (१६), जॉनी बेअरस्टो (१५), ख्रिस वोक्स (८), आदिल रशीद (५) आणि स्टुअर्ट ब्रॉड (०) या पाच फलंदाजांना त्याने तंबूत धाडले. तर दुसरीकडे मोहम्मद शमीने बेन स्टोक्स (१०)चा काटा काढला. इंग्लंडचा पहिला डाव १६१ धावात आटोपला असून हिंदुस्थानने पहिल्या डावात १६८ धावांची आघाडी घेतली आहे.

आज ६ बाद ३०७ धावसंख्येवरून हिंदुस्थानच्या फलंदाजांनी डावाला सुरुवात केली. दिवसाच्या सुरुवातीलाच संघला सातवा धक्का बसला. नवोदित ऋषभ पंत २४ धावा करून माघारी परतला. स्टुअर्ट ब्रॉडने त्याचा त्रिफळा उडवला. ऋषभ पंत बाद झाल्यानंतर पाठोपाठ अश्विन, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमरा तिघेही झटपट बाद झाले. ब्रॉड आणि अँडरसन दोघांनी २-२ गडी टिपले. त्यामुळे कालच्या ३०७ धावांमध्ये केवळ २२ धावांची भर घालून हिंदुस्थानचा डाव संपला. विराट-अजिंक्य वगळता संघाचे फलंदाज अपयशी ठरले. डावाच्या सुरूवातीला पहिले तीन गडी लवकर बाद झाल्यानंतर विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे यांनी डाव सावरत इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई केली. विराटने ९७ तर अजिंक्यने ८१ धावा काढत संघाची स्थिती मजबूत केली होती. पहिल्या डावात इंग्लंडकडून ख्रिस वोक्स, जेम्स अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड यांनी प्रत्येकी ३-३ गडी टिपले, तर आदिल रशीदने १ गडी बाद केला.

ऋषभ पंत आजही चमकला
कसोटी समान्यात पदार्पण करणाऱ्या ऋषभ पंत याने पहिल्याच सामन्यात इंग्लंडच्या पाच फलंदाजांचे झेल घेऊन त्यांना बाद केले. हा विक्रम करणारा ऋषभ पंत जगातील तिसरा तर हिंदुस्थानी संघाचा पहिला यष्टीरक्षक आहे. इंग्लंडच्या पहिल्या तीन फलंदाजांना पंतने झेलबाद केले.