
सामना ऑनलाईन । साऊथम्पटन
यजमान इंग्लंडने हिंदुस्थानविरुद्धचा चौथा कसोटी क्रिकेट सामना जिंकून पाच सामन्यांची मालिका 3-1 फरकाने आधीच खिशात घातली. विजयासाठी मिळालेल्या 245 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना विराट कोहलीची सेना दुसऱ्या डावात 69.4 षटकांत 184 धावांतच गारद झाली. इंग्लंडने 60 धावांनी जिंकलेली ही कसोटी हिंदुस्थानने हातातून घालवली.
लक्ष्याचा पाठलाग करताना हिंदुस्थानची अतिशय खराब सुरुवात झाली. स्टुअर्ट ब्रॉडने लोकेश राहुलला भोपळाही फोडू न देता त्याच्या यष्टय़ा वाकवून इंग्लंडला सनसनाटी सुरुवात करून दिली. त्याच्या जागेवर आलेल्या चेतेश्वर पुजाराला जेम्स ऍण्डरसनने 5 धावांवर पायचीत केले. त्यानंतर आघाडीवीर शिखर धवननेही (17) ऍण्डरसनच्या गोलंदाजीवर बेन स्टोक्सकडे झेल दिला.
हिंदुस्थानचा डाव 3 बाद 22 असा संकटात असताना कर्णधार विराट कोहली (58)आणि अजिंक्य रहाणे (51) यांनी चौथ्या गडय़ासाठी 92 धावांची भागीदारी करून हिंदुस्थानच्या आशा पल्लवित केल्या होत्या. मात्र हे दोघे बाद झाल्यानंतर सामना हिंदुस्थानच्या हातातून निसटला. त्याआधी इंग्लंडने सकाळी 8 बाद 260 धावसंख्येवरून पुढे खेळायला सुरुवात केली. मात्र त्यांचा दुसरा डाव 96.1 षटकांत 271 धावांवर संपुष्टात आला. हिंदुस्थानकडून मोहम्मद शमीने सर्वाधिक 4 बळी टिपले. इशांत शर्माने 2, तर रविचंद्रन अश्विन व जसप्रीत बुमराह यांनी 1-1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक
इंग्लंड पहिला डाव – 246 धावा
हिंदुस्थान पहिला डाव – 273
इंग्लंड दुसरा डाव – 271 धावा
हिंदुस्थान दुसरा डाव – 184


























































