
>>प्रा. अनिल कवठेकर
वर्ष संपताना मनोरंजन क्षेत्रातला लेखाजोखा मांडायचा ठरवलं तर काही चित्रपटाने प्रेक्षकांचे मनोरंजन केले तर काही चित्रपटांना प्रेक्षकांनी सपशेल नाकारले हे अगदी स्पष्ट दिसतेय. या वर्षात देशाभिमान, धार्मिक भावना कुरवाळणारे चित्रपट संख्येने जास्त आले असले तरी प्रेक्षकांनी सुंदर, रंजक, मनाला भावेल अशा पद्धतीने कथानक मांडणारे ‘ओ माय गॉड टू’ सारखे चित्रपटही उचलून धरले. एकूणच प्रेक्षकांच्या मनोरजनाच्या व्याख्या बदलू लागल्या आहेत.
कोरोना महामारीने विश्वात परिवर्तन आणले आणि त्याचा सर्वाधिक परिणाम ज्या घटकांवर झाला ते घटक म्हणजे मनोरंजनाची माध्यमे होय. नाटक, सिनेमा, तमाशा या तिघांना याचा मोठा फटका बसला होता. समूहात बसून चित्रपटाचा आनंद घेणे, आस्वाद घेणे, मध्यांतरामध्ये वडापाव खाताना त्यावर चर्चा करणे, पुन्हा चित्रपट संपल्यावर त्यावर चर्चा करणे ही एक आपल्या देशातील प्रेक्षकांची सामान्य मानसिकता होती, परंतु कोरोना महामारीच्या काळात त्या रोगाचा सामना करण्यापेक्षा घरात बसूनच चित्रपट पाहण्याला प्रेक्षकांनी अधिक मान्यता दिली आणि चित्रपटाच्या बॉक्स ऑफिसचे गणित कोलमडले.
कोरोनानंतर हे तसं पहिलं वर्ष असल्यामुळे या वर्षात सर्वच चित्रपट निर्मात्यांना, कलाकारांना, चित्रपट क्षेत्राशी संबंधित असणाऱया प्रत्येक व्यक्तीला अपेक्षा होती की, आता लोक थिएटरकडे वळतील आणि पुन्हा एकदा बॉक्स ऑफिस आपल्या जुन्या सुवर्णमय दिवसांत जाईल. त्यामुळे जानेवारी 2023 पासून ते नोव्हेंबर 2023 पर्यंत म्हणजे 11 महिन्यांच्या काळात सरासरी दर महिन्याला सात, आठ, दहा अशा प्रकारे चित्रपट रिलीज होऊनही चित्रपटाची संख्या दीडशेच्या आसपास जाते. विशेष म्हणजे या वर्षीच्या चित्रपटांमध्ये सर्वाधिक संख्या ही विनोदी चित्रपटांची आहे. युद्धपट आहेत, बायोग्राफी आहेत, ड्रामा आहे, अॅक्शन आहे, सस्पेन्स थ्रिलर आहे. चित्रपटाचे जेवढे प्रकार असतात ते सर्वच प्रकार या वर्षीच्या प्रदर्शित झालेल्या चित्रपटांमध्ये पाहायला मिळतात. यामध्ये फारशा प्रसिद्ध नसणाऱ्या कलाकारांचेही चित्रपट आहेत. त्याचबरोर जे कलाकार हुकमी यश प्राप्त करून देतात अशाही कलाकारांचे चित्रपट दणदणीत आपटलेले आहेत. त्यामध्ये अक्षय कुमारचे नाव घेता येईल. अक्षय कुमारचा ‘मिशन रानीगंज’ हा चित्रपट. खाणीच्या दुर्घटनेवर आधारित होता. फार पूर्वी ‘काला पत्थर’ नावाचा ब्लॉकबस्टर अशाच खाणीच्या घटनेवर आधारित चित्रपट होता, पण या वेळेस देशामध्ये निर्माण करण्यात आलेली देशभक्तीची लाट. ही लाट ज्या भक्तांनी निर्माण केली होती, त्यांना असं वाटत होतं की, या लाटेमध्ये कोणत्याही चित्रपटाचे जहाज आम्ही सहज तारू शकतो. एकदा ते यात यशस्वीही झाले होते. ‘द कश्मीर फाइल्स’ या लाटेनेच यशस्वी केला होता असे म्हणावे लागेल.
‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट जेव्हा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महोत्सवांत दाखल झाला, तेव्हा त्याला कोणतेही पुरस्कार प्राप्त झाले नाहीत. हा चित्रपटाच्या धर्तीवर ‘पूर्वांचल फाईल्स’ आला. तसेच ‘मायनस 31 – द नागपूर फाइल्स हे चित्रपट आले, पण केवळ नावात साधर्म्य म्हणून चित्रपट चालत नाही. यातून एक सिद्ध झाले, कोणत्याही प्रकारची लाट कोणताही चित्रपट यशस्वी करू शकत नाही. चित्रपटाची कथा, पटकथा आणि सादरीकरण जर उत्तम असेल तरच तो चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी होतो.
ज्या निर्मात्यांना असं वाटू लागलं होतं की, आता देशभक्तीशी, देशाशी संबंधित जर आपण चित्रपट निर्माण केले तर त्याचा आपल्याला नक्कीच फायदा होईल, अशा भावनेतून निर्माण झालेले चित्रपट पूर्णपणे आपटलेले आहेत हे या वर्षाचे वैशिष्ट्य. त्यामध्ये सगळ्यात वर चित्रपट आहे तो अक्षय कुमारचा ‘पृथ्वीराज.’ प्रेक्षक अक्षय कुमारवर या दोन कारणांनी नाराज झाले होते. एक, त्याने केलेली पान मसाल्याची जाहिरात आणि दुसरे, त्याने घेतलेली पीएम मोदींची मुलाखत. यात तो त्यांना विचारत होता, “आप आम कैसे खाते है?” आणि ही मुलाखत सर्व सोशल मीडियावर प्रसिद्ध झाली होती. त्यामुळे त्याला नकारात्मक प्रसिद्धी प्राप्त झाली. या पृथ्वीराजला हिंदुस्थानातील सर्वश्रेष्ठ हिंदू राजा दाखवण्याच्या प्रयत्नात त्याआधी सोशल मीडियावर केलेली तयारीही या चित्रपटाला तारू शकली नाही. हाच चित्रपट अक्षय कुमारच्या आयुष्यातील आणि हिंदुस्थानी सिनेमातील सर्वात मोठा फ्लॉप चित्रपट ठरला.
या वर्षी अक्षय कुमारचा ‘ओ माय गाड-2’ आला. शाळांमधून लैंगिक शिक्षण द्यावे असा या चित्रपटाचा विषय होता. या विषयावर आतापर्यंत अनेक चित्रपट येऊन गेलेले आहेत, पण या विषयाला आपल्या देशातील प्रेक्षक फारसा प्रतिसाद देत नाहीत. तसेच या विषयाबाबत प्रेक्षक फार गंभीर नाहीत किंवा अति गंभीर आहेत असे म्हणावे लागेल. या चित्रपटाला ‘ए’ सर्टिफिकेट असतानाही याने बॉक्स ऑफिसवर चांगला धंदा केला. चित्रपटाची कथा, पटकथा जर चांगली नसेल तर त्याला कोणतीही लाट तारू शकणार नाही.
कंगना राणावतच्या बाबतीतही तिला तिची अती भक्ती नडली. ‘तेजस’सारखा देशभक्तिपर, पारंपरिक दुश्मन पाकिस्तानचा विषय असणारा, महिला सशक्तीकरणाचा विषय असणारा. एक महिला एअर फोर्स पायलट रेस्क्यू मिशनमध्ये सहभाग घेते. स्वत कंगनाने सोशल मीडियावर आव्हान केल्यानंतरही अनेक रिह्यू घेणाऱयांनी आधी ‘तेजस’ला सामान्य चित्रपट म्हणून रिह्यू दिले होते. त्यांनी पुन्हा आपली भाषा बदलली. चित्रपटाबाबत खूप काही चांगलं सांगितले तरीसुद्धा ‘तेजस’ कोसळला तो कोसळलाच. कंगना राणावतने ‘चंद्रमुखी-टू’ या तामीळ, मल्याळम भाषेत निर्माण होणाऱया चित्रपटात काम केले. तो चित्रपट हिंदीमध्ये डब झाला आणि आपले भाग्य आजमावण्याचा तिने प्रयत्न केला, पण तरीसुद्धा या चित्रपटाला प्रेक्षकांनी नाकारलेच. यातून कलाकाराने काय शिकायला हवे?
पूर्वी क्रिकेट ‘क्रिकेट’ असायचं तसंच चित्रपट ‘चित्रपट’ असायचा, पण हिंदुस्थानला नव्याने स्वातंत्र्य मिळाल्याचा भ्रम निर्माण झालेल्यांना क्रिकेट म्हणजे धर्मयुद्ध वाटतं आणि चित्रपट म्हणजे हिंदू -मुसलमान युद्ध वाटतं. देशामध्ये हिंदुत्वाचे प्रचंड वारे वाहू लागल्याचे पाहून रामायणावर आधारित ‘आदिपुरुष’ नावाचा चित्रपट येणे आवश्यक होतंच, परंतु रामायणासारख्या संवेदनशील धार्मिक विषयातील चित्रपटाचे संवाद हे पारंपरिक पद्धतीचे न ठेवता त्यांना एक आधुनिक स्पर्श देण्याच्या भानगडीत त्या संवादाचे जे काही झाले, त्याचे वर्णन करणे शक्य नाही. त्यामुळे इतकी मोठी स्टारकास्ट असूनही आणि बिग बजेट असूनही ‘आदिपुरूष’सारखा धार्मिक चित्रपट धार्मिक वातावरण असूनही सपशेल आपटला. प्रेक्षकांनी हे दणकून सांगितले की, आमच्या धार्मिक भावनांमध्ये असे काही अजिबात चालणार नाही. याची दखल पुढे भविष्यात येणाऱया धार्मिक चित्रपटांना नक्कीच घ्यावी लागेल.
(क्रमश:)
(लेखक चित्रपट अभ्यासक आहेत)



























































