
वृक्षांवर कुऱ्हाड चालवून, गोदावरी नदी घाटांचे काँक्रिटीकरण करून सरकारने हरित कुंभ संकल्पना गुंडाळून ठेवली आहे, असा संताप व्यक्त करीत मंगळवारी पर्यावरणप्रेमींनी ऑक्सिजन रॅली काढून महापालिकेवर धडक दिली. वृक्षतोडीने शहराचे तापमान वाढत चालले आहे. त्यामुळे मनमानी थांबवा, असे आवाहन केले. द्राक्षांच्या शहरात केळीवाल्याची दादागिरी चालणार नाही असा सज्जड इशारा नाव न घेता कुंभमेळा मंत्र्यांना दिल्याने सरकारविरुद्धचा असंतोष दिसून आला.
काही महिन्यांपूर्वी तपोवनात माईस हबच्या नावाखाली सुमारे अठराशे वृक्षांच्या कत्तलीचा डाव महापालिकेने रचला होता. त्याविरोधात नाशिककर एकवटले, महाराष्ट्रभरातून या लढय़ाला बळ मिळाले. त्यानंतर उच्च न्यायालयाच्या आदेशाचे सर्रास उल्लंघन करीत रस्तेरुंदीकरणाच्या नावाखाली मनमानी पद्धतीने प्रशासनाने वृक्षतोडीचा धडाका लावला. यामुळे ‘शाश्वत विकास’, ‘हरित कुंभ’ या संकल्पना नावापुरत्या उरल्या आहेत. जिकडे तिकडे वृक्ष तोडून काँक्रिटीकरणाचा अतिरेक सुरू झाला आहे. घाट परिसरात काँक्रिटीकरण करून नदीवरही आक्रमण सुरू केले आहे. पानवेलींसह प्रदूषणाने गोदावरी नदी संकटात सापडली आहे. प्रशासनाच्या मनमानीच्या निषेधार्थ पीपल्स ट्री सिटिझन मूव्हमेंटने आज बीवायके सिग्नल येथून ऑक्सिजन रॅलीला सुरुवात केली. या रॅलीत माकपाचे ज्येष्ठ नेते डॉ. डी. एल. कराड, मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष सलीम शेख, रतनकुमार इचम, जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, शहराध्यक्ष सुदाम कांबडे, भाकपाचे राजू देसले, तल्हा शेख, पत्रकार निरंजन टकले, भारती जाधव, संदीप भानोसे, सोमा कुऱहाडे, आनंद रॉय, प्रतीक नाईक, जिज्ञासा जाधव, मानसी सरदेसाई अदिती पटेल सहभागी होते.
– कुंभ विकास आराखडय़ावर नागरिकांच्या हरकती व सूचना नोंदवून घेणे गरजेचे वाटले नाही का? असा सवाल करण्यात आला. नदी व झाडे जगवा, प्रयागराजप्रमाणे तात्पुरत्या घाटांची व्यवस्था करा. वृक्षांभोवती ट्रफिक आयलॅण्ड उभारण्याच्या न्यायालयाच्या आदेशाला डावलण्यात आले, याची चौकशी करा. अवैध वृक्षतोडीविरोधात जाब विचारणाऱया नाशिककरांवर पोलिसी बळाचा वापर करणाऱया दोषींवर कारवाई करा आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.
– ‘झाडांसाठी, आपल्या नाशिकसाठी चालू या’, असा संदेश दिला. राजीव गांधी भवन गाठून प्रवेशद्वारासमोर ठिय्या मांडला. गोदावरी व वृक्षरक्षणासाठी आम्ही लढा देत राहू, विकासाच्या नावाखाली नाशिकची ओळख पुसू देणार नाही, असा इशारा देण्यात आला. झाडं तोडणाऱया सरकारचा तीव्र निषेध करण्यात आला. ‘महापालिका प्रशासन, जागे व्हा, न्याय द्या’, अशा घोषणा देण्यात आल्या.
‘कुणी ऑक्सिजन देतं का… ऑक्सिजन’
ऑक्सिजन मास्क लावून तरुण या रॅलीत सहभागी होता. ‘कुणी ऑक्सिजन देतं का… ऑक्सिजन’ अशी आर्त साद घालत, फलक झळकावत त्याने भविष्यातील भयावह परिस्थितीविषयी नाशिककरांना सजग केले. कोरोना काळात ऑक्सिजनचे महत्त्व सर्वांना कळले. मग त्याचा अक्षय्य स्रोत असलेल्या वृक्षांवर कुऱहाड का चालवताय? उष्ण शहर अशी नाशिकची ओळख होतेय. राजकारणी लोक मूठभर बिल्डरांच्या फायद्यासाठी शहराला संकटात का ढकलत आहेत? असा सवाल केला. याचबरोबर ‘तपोवन वाचवा, नाशिक वाचवा’, ‘विकास हवा, विनाश नाही’, ‘हत्यारा विकास नको, हरित विकास हवा’, ‘गोदावरी वाचवा, जंगल वाचवा, जीवन वाचवा’, असे फलक झळकवण्यात आले.


























































