
विघ्नहर्ता गणरायाचे आगमन अवघ्या काही दिवसांवर आले आहे. प्लॅस्टिक आणि थर्माकोलला बंदी असल्याने सजावटीसाठी पर्यावरणपूरक देखाव्यांकडे नागरिकांचा कल वाढतोय. यानिमित्ताने अनेक तरुण कलाकारांना घरबसल्या रोजगाराची संधी उपलब्ध झाली असून कोरोनामुळे विस्कटलेली आर्थिक घडी सुरळीत होण्यास मदत होत आहे.
माहीमला राहणारा सर्वेश कीर हा तरुण बाप्पासाठी लागणारे त्रिशूळ, परशू, वीणा, डमरू, बासरी, प्रभावळ आदी वस्तू रद्दी पेपरपासून तयार करतो. दक्षिण मुंबईतील सात ते आठ मूर्तिकारांकडून त्याला ऑर्डर मिळतात. यंदा त्याने शंभरहून अधिक वस्तू तयार केल्या आहेत. कागदापासून बनवलेल्या वस्तू वजनाने हलक्या आणि दिसायला आकर्षक असल्यामुळे त्याला मोठी मागणी आहे. दरवर्षी गणेशोत्सवात माझ्यासारख्या कलाकारांना रोजगार मिळतो. जमा झालेल्या पैशांतून माझा पॉकेटमनी सुटतो आणि कॉलेजची फी भरण्यासदेखील मदत होते, असे तो सांगतो.
इरकली साडय़ांपासून देखावे

संदेश गावकर हा सर्वांगी आर्टस् या बॅनरखाली इरकली साडी आणि चोळीपासून पर्यावरणपूरक देखावे तयार करतो. या कामात त्याला पत्नी श्रद्धा गावकर आणि आई-वडिलांची साथ मिळते. यंदा त्यांनी ‘इरकल सर्कल’ मखर बाजारात आणले आहेत. ‘फक्त 3 स्टेपलर मारा आणि 2 मिनिटांत मखर तयार’ अशी त्यांची संकल्पना आहे. विविध आकर्षक रंगात मखर उपलब्ध आहेत. देखावा झटपट उभारता येतो आणि वर्षानुवर्षे वापरता येऊ शकतो. त्यामुळे त्याला देश-विदेशातून मोठी मागणी आहे. यंदा आपण देशभरात 400 हून अधिक मखरांची विक्री केली असून 14 मखर परदेशात पाठवल्याचे संदेशने सांगितले.
आकर्षक थ्रीडी मखर

प्रभादेवीत राहणारा अभिजीत मुरुडकर गतवर्षीपासून इकोफ्रेंडली मखर तयार करतो. यंदाही त्याने मोठा भाऊ आतीषच्या मदतीने दहा वेगवेगळ्या कॉन्सेप्टवर आधारित थ्रीडी मखर तयार केले आहेत. यासाठी त्याने न्यूज पेपर, टिश्यू पेपर आणि प्लायवूडचा वापर केला आहे. गणपती विसर्जनानंतर मखर वर्षभर घरात धूळ खात पडलेले असतात. मात्र अभिजीतने तयार केलेल्या मखरांच्या मध्यभागी एक फ्रेम तयार करण्यात आली आहे. या फ्रेमचा वापर घराच्या सजावटीसाठी देखील होऊ शकतो. ‘कोरोनामुळे कार्यक्रम, इव्हेंट बंद असल्याने अनेक कलाकार बेरोजगार झाले आहेत. मूलभूत गरजा भागवण्याकडे लोकांचा कल असल्याने कुणी साधी पेंटिंगही विकत घेत नाही. त्यामुळे कलाकारांची आर्थिक घडी विस्कटली आहे. गणेशोत्सवात सजावटीसाठी लोक आता कलाकारांकडे पर्यावरणस्नेही मखरांची मागणी करू लागले आहेत. त्यामुळे कलाकारांना काम मिळत आहे,’ असे अभिजीत सांगतो.


























































