
मोठय़ा पडद्यावर कारकीर्द घडवल्यानंतर काही काळ सिनेसृष्टीपासून दूर गेलेली अभिनेत्री ईशा देओल आता लेखिकेच्या भूमिकेत शिरली आहे. ‘अम्मा मिया’ हे ईशाचे पहिले पुस्तक येत्या मार्च महिन्यात प्रकाशित होणार आहे. लहान मुलांचे डाएट आणि त्यांना जेवणाची गोडी कशी लावता येईल, याचे मार्गदर्शन ईशा या पुस्तकातून करणार आहे. पेंग्विन प्रकाशन हे पुस्तक प्रकाशित करीत आहे. ईशा ही दोन मुलांची आई आहे. आपल्या मातृत्वाचे अनुभव इतर मातांना उपयोगी पडावे, या हेतूने तिने लेखनप्रपंच केला आहे. आई होण्याचा सुंदर अनुभव मी दोनदा घेतला आहे. हा नितांतसुंदर आनंद नवमातांशी शेअर करावा, ही माझी इच्छा आहे. त्यासाठीच सल्ला, टीप्स, गोष्टी, मुलांसाठी चवदार रेसिपी असे माझ्या पुस्तकाचे स्वरूप आहे. ‘अम्मा मिया’ पुस्तक म्हणजे नव्या मातांसाठी बेस्ट फ्रेंड, गाईड ठरेल असा विश्वास ईशाने व्यक्त केला.

































































