
माहुलमधील पालिका कर्मचाऱ्यांनी 330 घरांची लॉटरी जिंकल्यानंतरही केवळ 50 कर्मचाऱ्यांनी घराचे पैसे भरल्यामुळे घरांचे वितरण खोळंबले आहे. पैसे भरल्यानंतर 21 जूनपर्यंत घरांचा ताबा दिला जाणार होता. मात्र, पैसे न भरल्यामुळे आता पैसे भरण्यासाठी उर्वरित कर्मचाऱ्यांना 30 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यामुळे आधी विक्रीपूर्वी आणि आता विक्रीनंतर माहुलमधील घरांचा तिढा कायम राहिला आहे.
माहुल येथील घरांच्या विक्रीसाठी मिळालेल्या कमी प्रतिसादामुळे मुंबई महापालिकेने निकषात बदल करून दोन वेळा मुदतवाढ केली होती. माहुलमधील 9 हजार 98 घरांपैकी फक्त 330 घरांसाठी नोंदणी झाली. घरासाठी 12 लाख 60 हजार रुपये भरायचे आहेत. त्यासाठी महापालिकेकडून 8 टक्के दराने कर्जही उपलब्ध करून देण्यात आले आहे. मात्र, तरीही 330 विजेत्यांपैकी केवळ 50 जणांनी घराची संपूर्ण रक्कम भरली आहे. त्यामुळे जोपर्यंत या सर्व 330 घरांची विक्री किंमत भरली जाणार नाही तोपर्यंत सर्वांना ताबा दिला जाणार नाही, असे मुंबई महापालिकेने स्पष्ट केले आहे.
कमी किंमत असूनही अल्प प्रतिसाद
माहुलमधील सदनिकांमध्ये प्रकल्पबाधित राहायला जात नसल्याने तब्बल 13 हजारांवर घरे रिक्त आहेत. त्यापैकी 15 मार्चपासून 9 हजार 98 घरांसाठी अर्ज भरण्यास सुरुवात झाली. 15 एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली होती. या कालावधीत फक्त 231 अर्ज आले. अल्प प्रतिसादामुळे 15 मेपर्यंत मुदत वाढवण्यात आली. शिवाय निकषातही शिथिलता देण्यात आली. मात्र, बाजारभावापेक्षा किती तरी पटीने घरांची किंमत कमी असतानाही दोन महिन्यांनंतरही केवळ 330 अर्ज आले होते.


























































