जगातले सर्वोच्च शिखर म्हणजे एव्हरेस्ट. या शिखराची उंची दरवर्षी वाढत आहे. दरवर्षी दोन मिलिमीटरने उंची वाढत आहे. शेकडो वर्षांपासून ही प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे सर्वसाधारण उंचीपेक्षा एव्हरेस्ट शिखर सध्या 15 ते 20 मीटरने उंच झाले आहे. अर्थात त्यासाठी फार मोठा काळ लागला आहे. नुकत्याच झालेल्या एका अभ्यासातून ही माहिती उघड झालीय.
युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन (यूसीएल) येथून पीएचडी करणारे अॅडम स्मिथ आणि भूगर्भशास्त्रज्ञ मॅथ्यू फॉक्स यांच्या म्हणण्यानुसार, हिमालयाच्या सर्वात उंच भागापासून सुमारे 75 किलोमीटर दूर असलेल्या अरुण नदीमुळे एव्हरेस्टच्या उंचीत बदल होत आहे. नदीच्या अंतर्गत भागातील बदलामुळे परिणाम दिसून येतोय. साधारण 89 हजार वर्षांपूर्वी अरुण नदीचा काही भाग हिमालयातील कोसी नदीत विलीन झाला. त्यामुळे नदीचे पात्र आणि मार्ग बदलला. त्यामुळे नदीची आणि आजूबाजूच्या परिसराची धूप वाढली. तिथले खडक आणि माती वाहून गेली. त्यामुळे तिथल्या पृष्ठभागाचे वजन कमी झाले. या कारणामुळे एव्हरेस्टची उंची वाढत आहे.
साधारणपणे चार ते पाच कोटी वर्षांपूर्वी भूगर्भातील हालचालींमुळे हिमालयाची निर्मिती झाली असावी असे म्हटले जाते. त्यात अजूनही बदल सुरू आहेत. यापुढेही बदल होत राहतील. काही काळानंतर हिमालयाची उंची वाढणे थांबेल. या प्रक्रियेला काही हजार वर्षे लागू शकतात, असे संशोधकांचे म्हणणे आहे.
नेचर जियोसायन्समध्ये प्रसिद्ध शोधनिबंधात असे म्हटलेय की, केवळ एव्हरेस्टच नव्हे तर इतरही शिखरांची उंची वाढत आहे. हिमालयातील ल्होसे आणि मकालू या चौथ्या आणि पाचव्या क्रमांकाच्या शिखरांचीही उंची वाढत आहे.
संशोधकांमध्ये दुमत
एव्हरेस्ट दरवर्षी किती नवीन उंची गाठत आहे हे जीपीएसने समजू शकते. काही संशोधकांच्या एव्हरेस्टच्या वाढीबद्दलचा अभ्यास विश्वसनीय वाटत असला तरी अद्याप त्यांना अनेक गोष्टींची स्पष्टता अपेक्षित आहे. काही संशोधक या अभ्यासाविषयी साशंक आहेत.
गिर्यारोहकांपुढे आव्हान
एव्हरेस्टची उंची आणखी किती वाढेल हे निश्चित नाही. मात्र यामुळे गिर्यारोहकांच्या अडचणीत वाढ होणार आहे. एव्हरेस्टची उंची आता 8849 मीटर आहे. इतक्या उंचीवर हवामान अतिशय विरळ असते. ऑक्सिजनचे प्रमाणही घटलेले असते.