
खेड तालुक्यात मतदान प्रक्रियेला सुरुवात होताच ईव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने अनेक मतदान केंद्रांवर गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. खेड तालुक्यातील निगडे येथील आदर्श मतदान केंद्र क्रमांक 15/10 येथे सकाळी मतदान सुरू होताच ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड झाला. या बिघाडामुळे तब्बल एक ते दीड तास मतदान प्रक्रिया पूर्णपणे थांबली. सकाळच्या वेळेत मतदानासाठी आलेल्या अनेक मतदारांचा यामुळे मोठा खोळंबा झाला. काही मतदारांना कामावर जाण्याची घाई असल्याने त्यांनी मतदान न करताच माघार घेतली. त्यामुळे मतदारांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून, हा प्रशासनाचा हलगर्जीपणा असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.
तांत्रिक बिघाडाची माहिती मिळताच निवडणूक विभागाचे अधिकारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. बिघाड दूर करण्याचे प्रयत्न सुरू असतानाच मतदान केंद्रावर तणावाचे वातावरण निर्माण झाले. अखेर नवीन ईव्हीएम मशीन रिप्लेसमेंट करून तब्बल एक ते दीड तासानंतर मतदान प्रक्रिया पूर्ववत सुरू करण्यात आली. निगडे गावासह खेड तालुक्यातील सहा ते सात मतदान केंद्रांवर सकाळी सात वाजता मतदान सुरू होताच अशाच प्रकारच्या तांत्रिक बिघाडाच्या घटना घडल्याचे समोर आले आहे. यामुळे अनेक ठिकाणी मतदारांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. मतदानाच्या पहिल्याच तासात अशा प्रकारच्या तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने निवडणूक यंत्रणेच्या तयारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. मतदारांचा मौल्यवान वेळ वाया गेल्याने प्रशासनाने याची जबाबदारी घ्यावी, अशी मागणीही नागरिकांकडून होत आहे.































































