विखे यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाकडे त्यांच्याच आजी माजी आमदारानी फिरवली पाठ; तर्कवितर्कांना उधाण

sujay-vikhe-patil

नगर तालुक्यामध्ये रविवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. विखे यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता. मात्र, फडणवीस यांनी या कार्यक्रमांकडे पाठ फीरवल्यानंतर नगर जिल्ह्यातील आजी-माजी आमदारांनी सुद्धा या सोहळ्याकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे भाजप अंतर्गत आता उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे. तसेच याबाबत अनेक तर्कवितर्क करण्यात येत आहेत.

नगर तालुक्यातील साकलाई सिंचन योजनेचा संदर्भाचा विषय 30 वर्षांपासून गाजत होता. याबाबत खासदार सुजय विखे यांनी पाठपुरावा करून सरकारकडून या योजनेसाठी जास्तीत जास्त निधी मिळावा यासाठी प्रयत्न सुरू केले होते. राज्य शासनाने या योजनेच्या सर्वेक्षणासाठी निधी उपलब्ध करून दिला आणि या योजनेच्या निधीलाही मंजूरी दिली. या निमित्ताने या भागामध्ये 35 हून अधिक गावांना योजना सुरू झाल्यावर पाणी मिळेल अशी शक्यता आहे.

खासदार सुजय विखे व पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी याचे श्रेय घेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या ठिकाणी एक शेतकरी मेळावा आयोजित करत फडणवीस यांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता. त्यासाठी फडणवीस यांनीही वेळ दिला होता. तसेच त्यांनी पाथर्डी दौराही आयोजित केला होता. मात्र, फडणवीस यांनी दौरा रद्द करत नगर जिल्ह्यामध्ये येण्याचे टाळले.

फडणीस यांचा या कार्यक्रमात सत्कार होणार होता. मात्र, तो काही झाला नाही. कार्यक्रमात ऑनलाईन सहभागी होत त्यांनी उपस्थिती नोंदवली. उपमुख्यमंत्री फडणवीसच या कार्यक्रमाला नसल्याने भाजपच्या आजीमाजी आमदारांनीही कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. या कार्यक्रमांमध्ये भाजपचे आमदार राम शिंदे, आमदार मोनिका राजळे, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे माजी आमदार स्नेहलता कोल्हे ,आमदार बबनराव पाचपुते यांच्या सह आजी-माजी आमदारांनी या कार्यक्रमांकडे पाठ फिरवली. त्यामुळे भाजप अंतर्गत आता उलट सूलत चर्चा सुरू झाली आहे .वास्तविक पाहता एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कार्यक्रम आयोजित केला होता त्यात शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले होते. स्थानिक पातळीवर पदाधिकारी का उपस्थित राहिले नाही .याबद्दलच उलट सुलट चर्चा आता सुरू झाली आहे .एकंदरीतच विखें बद्दल असलेली नाराजी ही आता या निमित्ताने पुढे येऊ लागल्याची चर्चा आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने नगर जिल्ह्यामध्ये आता भाजपमध्ये अंतर्गत कलह सुरू असल्याची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे.