खडसेंनंतर भाजपचा आणखी एक बडा नेता राष्ट्रवादीच्या गळाला, कामाची कदर नसल्याची टीका

ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यानंतर भाजपचा आणखी एक बडा नेता राष्ट्रवादी काँग्रेसच्या गळाला लागला आहे. बीडचे भाजपचे माजी खासदार जयसिंगराव गायकवाड यांचा आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश झाला. यावेळी त्यांनी भाजपात कामाची कदर नसल्याची टीका केली.

भाजपात कामाची कदर नाही, कौतुक नाही. चांगल्या कार्यकर्त्यांचे वाळवंट करण्याचे काम भाजपने केल्याचा आरोप जयसिंगराव गायकवाड यांनी बोलताना केला. तसेच जिथे कोंडमारा होतोय त्या पक्षात रहायचं नाही ठरवलं आणि आता राष्ट्रवादीत प्रवेश करुन मोकळा श्वास घेत असल्याचेही जयसिंगराव गायकवाड यांनी सांगितले.

‘रेकॉर्ड ब्रेक मतदान मिळवून देणार’

सतीश चव्हाण यांना साथ देवून रेकॉर्ड ब्रेक मतदान मिळवून देणार आहे. जी जबाबदारी द्याल ती प्रामाणिकपणे पार पाडेन. आता फक्त राष्ट्रवादी काँग्रेस असणार आहे असे प्रवेश करताना जयसिंगराव गायकवाड यांनी सांगितले.

‘चांगला सहकारी आपल्यात आला’

एक चांगला सहकारी आपल्यात आला आहे. सार्वजनिक जीवनात आदर्श कसा ठेवावा हे कळते. जयसिंगराव गायकवाड जिथे गेले होते तिथे त्यांचं मन रमलं नाही. देशात असा एकमेव खासदार असेल जो कधी घरी गेला नाही. तर मतदारसंघात फिरत राहिला. सर्वसामान्य माणसांच्या सुखदुःखात सहभागी होत राहिला. सत्ता ही विनम्रपणे सांभाळायची असते हे त्यांनी केलं. त्यांचे पक्षात स्वागत आहे, असे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या