माजी नगरसेविकेला ब्लॅकमेल करून बलात्कार, पुण्यातील धक्कादायक घटना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मैत्रीपूर्ण संबंधांचा गैरफायदा घेत एका माजी नगरसेविकेला ब्लॅकमेल करून तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना पुणे शहरात घडली आहे. एका माजी नगरसेविकेसोबत असा प्रकार घडल्याने पुणे शहरातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

आरोपीचं नाव सचिन असल्याची माहिती मिळत आहे. सचिन आणि पीडितेचे मैत्रीपूर्ण संबंध होते. या संबंधांचा गैरफायदा घेऊन सचिन पीडितेला तिच्यासोबतचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत होता. तसंच, हे फोटो आणि व्हिडीओ तिच्या नवऱ्याला दाखवण्याची धमकीही पीडितेला सचिनने दिली होती. बदनामीची धमकी देऊन सचिनने तिच्यावर वेळोवेळी बलात्कार केला. 2017 सालापासून म्हणजेच जवळपास सहा वर्षांपासून हा प्रकार सुरू होता. या काळात त्याने पीडितेकडून 10 लाख रुपयेही घेतले होते.

सहा वर्षं आरोपीकडून होणारा लैंगिक छळ आणि आर्थिक शोषण सहन केल्यानंतर पीडितेने त्याच्या धमक्यांना कंटाळून पर्वती पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. या प्रकरणी आरोपी सचिन विरुद्ध लैंगिक छळ, खंडणी वसुली तसंच इतर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला. त्या गुन्ह्यांसाठी सचिन याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात सचिनसह अन्य कुणी सहभागी आहे का, तसंच ज्या फोटो आणि व्हिडीओंची धमकी सचिन देत होता, ते त्याने अन्य कुणाला पाठवले आहेत का, याचा तपास पोलीस करत आहेत.