सामना आजी-माजी नगरसेवकांचा

926

भांडुप विधानसभा मतदारसंघात यावेळी आजी आणि माजी नगरसेवक यांच्यात लढत होणार असल्याने येथील निवडणूक उत्सुकतेचा विषय बनली आहे. भांडुप मराठमोळ्या श्रमिकांचा मतदारसंघ असून यावेळी महायुतीच्या वतीने शिवसेनेचे नगरसेवक, विभागप्रमुख रमेश कोरगावकर तर काँग्रेस महाआघाडीतर्फे माजी नगरसेवक सुरेश कोपरकर रिंगणात आहेत.

भांडुपमध्ये मराठी मतदार मोठय़ा प्रमाणावर असल्याने हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. 80 टक्के मराठी आणि कोंकणी माणूस या मतदारसंघात आहेत. त्यामुळे येथे शिवसेनेचेच प्राबल्य आहे. भांडुप मतदारसंघ डोंगराळ भाग असल्याने रस्ते, पाणी आणि शौचालये अशा पायाभूत सोयीसुविधांचे आव्हान आहे.

मतदारसंघातील आव्हाने
भांडुपमधील अरुंद रस्ते, वाहतूक कोंडी, रखडलेले झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प आणि नवे प्रकल्प वेळेत पूर्ण करणे.
गेल्या काही वर्षांत वाढलेली संघटित गुन्हेगारी संपवणे.
डोंगराळ भागात सर्व पायाभूत सोयीसुविधा पोहोचवणे

भौगोलिक परिस्थिती
भांडुपला ठाणे, मुंबई, पवई, पश्चिम उपनगरे उड्डाणपुलांनी जोडली गेल्यामुळे भांडुप हे विकासाचे केंद्रबिंदू झाले आहे.भांडुपमध्येही मोठय़ा कंपन्या, कारखाने, छोटी-मोठी औद्योगिक संकुले होती. या कारखान्यांमध्ये काम करणारा कुशल-अकुशल कामगारवर्ग भांडुपमध्ये वसला. येथे सुमारे 70 टक्के लोकसंख्या मराठी असून त्यात कोकणातून उदरनिर्वाहासाठी आलेल्या आणि इथेच वसलेल्या चाकरमान्यांची संख्या मोठी आहे. बंद पडलेल्या कारखान्यांच्या जागेत मोठी गृहसंकुले उभी राहिली आहेत.

रंगतदार लढत
रमेश कोरगावकर यांची नेहमीच मदतीला धावून जाणारा कार्यकर्ता अशी ओळख आहे. लोकसभा लढतीत कोरगावकर यांनी संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला. युतीधर्म पाळत कोरगावकर यांनी मनोज कोटक यांच्यासाठी प्रचाराचा धडाका कायम ठेवला. त्यामुळे यावेळच्या लढतीत भाजपचा प्रत्येक पदाधिकारी त्यांच्या प्रचारात उतरला असून त्याचा फायदा शिवसेनेला होणार आहे तर काँग्रेस महाआघाडीचे कोपरकर हेदेखील मदतीला धावून जाणारे काँग्रेसचे धडाडीचे कार्यकर्ते आहेत. मनसेने विभाग अध्यक्ष संदीप जळगावकर यांना उमेदवारी दिली परंतु पक्ष संघटनेची कमकुवत बांधणी आणि अंतर्गत गटबाजी या गोष्टींमुळे त्यांच्यासाठी ही लढत खडतर आहे.

आपली प्रतिक्रिया द्या