
एखाद्या आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळल्या जाणाऱ्या खेळांच्या स्पर्धांचा खूप मोठा ताण खेळाडूंवर असतो. अवघ्या देशाचं लक्ष त्या खेळाडूवर लागलेलं असतं. अशा वेळी ताण हलका करण्यासाठी प्रत्येक मॅचपूर्वी सेक्स करायचो असा खुलासा एका माजी खेळाडूने केला आहे.
या खेळाडूचं नाव रोमारियो असं असून ते ब्राझील या देशाचे प्रसिद्ध फुटबॉलपटू आहेत. जगभरातल्या उत्कृष्ट फुटबॉलपटूंमध्ये त्यांची गणना होते. ते आता 56 वर्षांचे आहेत. त्यांनी एका संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत त्यांच्या आयुष्यातले अनेक पैलू उलगडून सांगितले आहेत.
View this post on Instagram
त्यांच्या म्हणण्यानुसार, मी सध्या आपलं निवृत्त जीवन जगत असलो तरी मला माझं वैयक्तिक आयुष्य आहे. जेव्हा मी फुटबॉलच्या मॅच खेळत होतो, तेव्हा मॅचपूर्वी ताण घालवणं माझ्यासाठी गरजेचं असायचं. माझ्या मते ताण घालवण्यासाठी ज्याला जी गोष्ट ताणमुक्त करते, ती गोष्ट त्याने आवर्जून करावी. माझ्यासाठी सेक्स ही नेहमीच ताणमुक्त करणारी गोष्ट आहे. अनेकदा मी मॅचच्या आधी बाकी खेळाडूंपासून वेगळा राहायचो. जर मला ताण वाटला तर मॅचपूर्वी मी माझ्या पत्नीसोबत शारीरिक संबंध ठेवायचो. त्यामुळे मैदानात मला शांत आणि हलकं वाटायचं, असा खुलासा त्यांनी केला आहे.
सध्या रोमारियो हे त्यांच्यापेक्षा बऱ्याच कमी वयाच्या मार्सेल सिओलिन या तरुणीला डेट करत आहेत. रोमारियो यांना बऱ्याचदा त्यांच्या वर्तनावरून स्त्रीलंपट म्हटलं गेलं आहे. रोमारियो यांनी आतापर्यंत तीन लग्न केली असून शेवटचं लग्न त्यांनी 2010मध्ये केलं होतं. मात्र, दोनच वर्षांत त्यांचा घटस्फोट झाला.




























































