
सामना प्रतिनिधी, परंडा
येथील माजी आमदार नानासाहेब उर्फ वासुदेवराव देशमुख यांचे मंगळवारी पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. नानासाहेब देशमुख हे पहिल्यांदा १९७२ साली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या तिकीटावर निवडणूक लढवून आमदार झाले होते. त्यानंतर १९७८ साली ते जनता पार्टीच्या तिकीटावर निवडून आले होते.
त्यांनी त्यांच्या आमदारपदाच्या कार्यकाळात रोजगार हमी योजना व कापूस एकाधिकार खरेदी योजना सुरू करण्यास शासनास भाग पाडले. पुढे या योजना एक मापदंड ठरल्या. तसेच धाराशिव जिल्हा हा मागासलेला असल्याने शासनाच्या विविध योजनाच्या माध्यमातून त्यांनी जिल्ह्यात विविध जलसंधारणाचे प्रकल्प राबविले.
आज पहाटे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी चार वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. मंगळवार पेठ भागातील सर्व व्यावसायिकांनी आपली दुकाने बंद ठेवून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
summary- ex mla vasudeorao deshmukh passed away



























































