
सामना ऑनलाईन। चंदीगढ
1999 मध्ये झालेल्या कारगिल युद्धापूर्वी तत्कालीन गृहमंत्री लालकृष्ण अडवाणी यांना याबाबतची गुप्त माहिती देण्यात आली होती, असा दावा हिंदुस्थानी गुप्तचर यंत्रणा रॉचे माजी प्रमुख अमरजितसिंह दुलत यांनी केला आहे. कारगिल युद्ध हे गुप्तचर यंत्रणांच्या अपयशामुळे झाले असा समज आहे. दुलत यांच्या या दाव्यामुळे या समजाला छेद देण्यात आला आहे. युद्ध होण्यापूर्वी सीमारेषेवर होत असलेल्या संशयास्पद हालाचाली आणि इतर माहिती योग्यवेळी गृहमंत्रालयाला देण्यात आली होती. चंदीगढमध्ये झालेल्या सैन्य साहित्य महोत्सवातील एका चर्चेदरम्यान त्यांनी ही माहिती दिली. गुप्तचर यंत्रणा अपयशी ठरल्याचे मत निराशजनक आहे. गुप्त माहिती मिळाल्यानंतर त्यावर योग्य कारवाई करून पढील निर्णय घेणे ही एक कला आहे. ती प्रत्येकाकडे नसते. तसेच फक्त गुप्त माहिती मिळाल्याने युद्ध टाळता येणार नाही. त्यासाठी कठोर कारवाईची गरज असते, असे मतही या चर्चेत व्यक्त करण्यात आले.
कारगिल युद्धावेळी दुलत रॉमध्ये कार्यरत होते. सीमारेषेवर असामान्य आणि संशयास्पद हालाचाली सुरू असल्याची माहिती आम्हाला मिळाली होती. लष्काराच्या अभिप्रायसह ही सर्व माहिती गृहमंत्रालयाला देण्यात आली होती असे त्यांनी स्पष्ट केले. पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान लष्काराच्या हातातील बाहुले आहेत का यावर ते म्हणाले इमरान यांना काही वेळ देण्याची गरज आहे. 2008 मध्ये मुंबईवर झालेला हल्ला ही दहशतवादाची घटना असल्याचे त्यांनी मान्य केले आहे. तसेच हिंदुस्थानसमोर मैत्रीचा हात पुढे केला आहे. त्यामुळे इमरान यांच्याबाबत मत ठरवण्यासाठी आपल्याला काही काळ वाट पाहवी लागेल असे ते म्हणाले.
गुप्तचर यंत्रणेला मिळालेली माहिती पुढे पाठवण्यासाठी वाट पाहता येत नाही. मंत्रालयाकडे ही माहिती गेल्यानंतर त्यावर सांजस्याने विचार करून पुढची दिशा ठरवावी लागते. ते खूप कठीण काम असल्याचे निवृत्त लेफ्टनंट जनरल संजीव लंगर यांनी सांगितले. जम्मू कश्मीर आणि ईशान्येकील राज्यात सुरक्षा दलाकडून करण्यात येणाऱ्या मोहीमा या गुप्तचर यंत्रणेच्या 30 टक्के माहितीवर आधारीत असतात. कोणतीही गुप्त माहिती हाती आल्यावर त्याचे तपशील मिळण्याची वाट बघता येत नाही. या माहितीमुळे पुढील धोरण आणि दिशा ठरवण्यासाठी सरकारला अनेक पर्याय उपलब्ध होत असल्याचे लंगर यांनी सांगितले. एकाच व्यक्तीला गुप्तचर यंत्रणांची माहिती देऊन कार्यवाही करण्याची जबाबदारी असेल तर ते आत्मघाती ठरू शकते असे मतही त्यांनी व्यक्त केले. तिन्ही दलांचे एकत्रित इंटेलिजन्स कमांड स्थापन होत नाही. तोपर्यंत गुप्तचर यंत्रणेवर टीका होत राहणार. मात्र, हे यंत्रणेचे अपयश नसून व्यवस्थेतील दोष आहे असे परखड मत निवृत्त लेफ्टनंट जनरल कमल डावर यांनी व्यक्त केले.
























































