मध्य रेल्वेवरील 15 डब्यांच्या लोकल विस्ताराचे काम कासव गतीने, 34 पैकी फक्त 5 स्थानकांवरच प्लॅटफॉर्म वाढवण्याचे काम पूर्ण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईच्या उपनगरी रेल्वे प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेने 15 डब्यांच्या लोकल सेवा वाढवण्याचा आराखडा तयार केला असला तरी त्याची अंमलबजावणी मात्र अत्यंत संथ गतीने सुरू आहे. टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते कल्याण/कसारा/खोपोली मार्गावरील 34 स्थानकांपैकी आतापर्यंत केवळ 5 स्थानकांवर प्लॅटफॉर्म वाढवण्याचे काम पूर्ण झाले आहे.

या विलंबामुळे सुधारित उपनगरी वेळापत्रक लागू होण्याबाबतही अनिश्चितता निर्माण झाली आहे. पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा झाल्यानंतर नवीन वेळापत्रक लागू करण्याचा विचार रेल्वेकडून करण्यात आला होता.

या प्रकल्पांतर्गत या मार्गावरील 50 हून अधिक प्लॅटफॉर्म वाढवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. गर्दीच्या वेळी होणारी प्रचंड प्रवासी गर्दी कमी करण्यासाठी 15 डब्यांच्या गाड्यांची संख्या वाढवण्याच्या उद्देशाने रेल्वे मंडळाच्या सूचनेनुसार हा निर्णय घेण्यात आला होता.

सध्या 15 डब्यांच्या गाड्या फक्त फास्ट मार्गावरच धावू शकतात. कारण या मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, भांडुप, मुलुंड, ठाणे, डोंबिवली आणि कल्याण या 10 स्थानकांवरच प्लॅटफॉर्म 15 डब्यांच्या गाड्यांसाठी पुरेसे लांब आहेत.

प्लॅटफॉर्म वाढवण्याचे काम विविध संस्थांमध्ये विभागण्यात आले आहे. मुंबई रेल्वे विकास महामंडळ (MRVC) चार स्थानकांचे काम पाहत आहे, तर मध्य रेल्वे मुख्यालयाच्या बांधकाम विभागाकडे सहा स्थानके आहेत. उर्वरित 24 स्थानकांचे काम मुंबई विभागाकडे सोपवण्यात आले आहे.

आतापर्यंत विठ्ठलवाडी, उल्हासनगर, अंबरनाथ, कर्जत आणि तानशेत या स्थानकांवर प्लॅटफॉर्म विस्ताराचे काम पूर्ण झाले आहे.

मात्र कल्याणनंतरच्या अनेक स्थानकांवर अजूनही काम अपूर्ण आहे. कल्याण–कसारा मार्गावर शहाड, आंबिवली, टिटवाळा, खडवली, वासिंद, आसनगाव, आटगाव, खर्डी, उंबरमाळी आणि कसारा या स्थानकांवर अद्याप काम बाकी आहे. त्याचप्रमाणे कल्याण–खोपोली मार्गावर वांगणी, शेलू, भिवपुरी, पळसदरी, केळवली, डोलवली, लोवजी आणि खोपोली या स्थानकांवरही प्लॅटफॉर्म वाढवण्याचे काम रखडले आहे.

सध्या सीएसएमटी येथे फक्त प्लॅटफॉर्म क्रमांक 7 वरच 15 डब्यांची लोकल उभी करता येते. याच प्लॅटफॉर्मचा वापर सेवाबाह्य वेळेत रेक ठेवण्यासाठीही केला जातो. प्लॅटफॉर्म क्रमांक 5 आणि 6 वाढवून पूर्ण झाल्यानंतर आणखी एक 15 डब्यांची रेक उभी करता येईल, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.

तसेच सध्या कल्याण येथे अर्धीच स्टेबलिंग लाईन उपलब्ध असल्याने 15 डब्यांच्या गाड्यांची संख्या वाढवण्यावर मर्यादा येत आहेत.

15 डब्यांची लोकल साधारण 25 टक्के अधिक प्रवासी वाहून नेऊ शकते. 12 डब्यांच्या गाडीत सुमारे 3,504 प्रवासी बसू शकतात, तर 15 डब्यांच्या गाडीत सुमारे 4,380 प्रवासी प्रवास करू शकतात. त्यामुळे अशा गाड्यांची संख्या वाढल्यास गर्दी कमी होण्यास मोठी मदत होईल, असा विश्वास रेल्वे प्रशासनाने व्यक्त केला आहे.

मध्य रेल्वेने 2017 मध्ये कल्याणपलीकडे 15 डब्यांच्या सेवा वाढवण्याचा आराखडा तयार केला होता. पहिल्या टप्प्यात कर्जत मार्गावरील अंबरनाथ आणि बदलापूरसारख्या वेगाने वाढणाऱ्या उपनगरांचा समावेश आहे, तर दुसऱ्या टप्प्यात टिटवाळा आणि आसनगावसह कसारा मार्गाचा समावेश आहे. सध्या ठाण्यानंतर फक्त डोंबिवली आणि कल्याण येथेच 15 डब्यांच्या गाड्या हाताळण्याची क्षमता आहे.

दरम्यान, पश्चिम रेल्वेवर 211 पंधरा डब्यांच्या लोकल सेवा (97 फास्ट आणि 114 स्लो) सुरू आहेत. त्याउलट मध्य रेल्वेवर सध्या फक्त 22 सेवा, त्या देखील फास्ट मार्गावरच चालतात. त्यामुळे बहुतांश प्रवाशांना अजूनही प्रचंड गर्दीतून प्रवास करावा लागत आहे.