
मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने उपनगरी स्थानकांचा कायापालट तसेच प्रवाशी सुविधांचा विस्तार करण्यासाठी ठोस पावले उचलली आहेत. त्या योजने अंतर्गत गेल्या महिन्यात ठिकठिकाणी 6 नवीन एस्केलेटर्सची उभारणी केली असून विविध स्थानकांत 391 नवीन एलईडी दिवे, बीएलडीसी व एचव्हीएलएस पंखे, वॉटर कुलरची व्यवस्था केली आहे. प्रवाशांच्या आवश्यकतेनुसार सुविधांमध्ये वाढ करण्यात आली आहे.
मध्य रेल्वेच्या प्रमुख स्थानकांबरोबर इतर स्थानकांत प्रवाशांची वर्दळ वाढत आहे. वाढत्या प्रवाशी संख्येचा विचार करून मध्य रेल्वे प्रशासनाने उपनगरी स्थानकांच्या विकासाकडे लक्ष पेंद्रित केले आहे. त्यानुसार गेल्या महिन्यात अनेक स्थानकांत प्रवाशी सुविधांचा विस्तार करण्यात आला. मेन लाईन आणि हार्बर लाईनवर एकूण 6 नवीन एस्कलेटर्सची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. त्यात पनवेल स्थानकावर 3, नेरळ स्थानकावर 2 आणि बदलापूर स्थानकावर 1 एस्कलेटरचा समावेश आहे. तसेच विविध स्थानकांवर एकूण 391 नवीन एलईडी दिवे आणि 148 नवीन ब्रशलेस डायरेक्ट करंट बीएलडीसी पंखे बसविण्यात आले. एलईडी दिवे ऊर्जा कार्यक्षम आणि पर्यावरणपूरक आहेत. बीएलडीसी पंखे पारंपरिक इंडक्शन मोटर पंख्यांच्या तुलनेत कमी आवाज करणारे आहेत. या पंख्यांमुळे ऊर्जेचा वापर 50 ते 70 टक्क्यांनी कमी होत असल्याचे मध्य रेल्वेच्या अधिकाऱयांनी सांगितले. त्याचबरोबर अंबरनाथ स्थानकावर 14 नवीन इंडिकेटर्स, लोणावळा स्थानकावर प्लॅटफॉर्म क्रमांक 2/3वर नवीन
वॉटर कुलरची व्यवस्था केली आहे.
दादर रेल्वे स्थानकात थंडावा देणारे पंखे
दररोज लाखो प्रवाशांची वर्दळ असणाऱया दादर रेल्वे स्थानकाच्या तिकीट बुकिंग कॉन्कोर्समध्ये दोन अत्याधुनिक एचव्हीएलएस पंखे बसविण्यात आले आहेत. हे पंखे मोठय़ा जागेत प्रभावी थंडावा निर्माण करतात. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांत प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. सुलभ प्रवास आणि सुरक्षिततेला प्राधान्य देत सुविधांचा विस्तार केला जात असल्याचे वरिष्ठ अधिकाऱयांनी स्पष्ट केले.



























































