
शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) 25 टक्के प्रवेश प्रक्रियेसाठी 22 मेपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. यंदा जिह्यात एक हजार 821 जागांसाठी साडेचार हजारांहून अधिक ऑनलाइन अर्ज भरले होते. यातील पहिल्या फेरीत एक हजार 170 विद्यार्थ्यांचे प्रवेश अंतिम झाले आहेत.
शिक्षण हक्क कायद्यानुसार दुर्बल व वंचित घटकातील बालकांना आरटीईअंतर्गत खासगी शाळांमध्ये जागा राखीव ठेवण्यात येतात. या जागांवरील प्रवेशासाठी प्राथमिक शिक्षण विभागातर्फे ऑनलाइन अर्ज प्रक्रिया राबविण्यात आली. त्यानुसार जिह्यात एक हजार 821 जागांसाठी साडेचार हजारांहून अधिक ऑनलाइन अर्ज आले आहेत. या अर्जानंतर ऑनलाइन लॉटरी सोडत झाल्यानंतर निवड यादीतील विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी 13 ते 25 एप्रिलपर्यंत मुदत दिली होती. मात्र, वारंवार सर्व्हर डाऊनचा अडथळा येत असल्याने 15 मेपर्यंत मुदतवाढ दिली होती. या कालावधीतही विद्यार्थ्यांचे प्रवेश न झाल्याने पुन्हा 22 मेपर्यंत मुदतवाढ दिली आहे. उर्वरित जागांसाठी दुसऱ्या फेरीत निवड केली जाणार आहे.
दरम्यान, आरटीई प्रवेशाच्या पहिल्या फेरीत एक हजार 170 प्रवेश अंतिम करण्यात आले आहेत. जिह्यातील निवड यादीतील विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी सर्व तालुकास्तरावर पडताळणी केंद्रे सुरू आहेत. या ठिकाणी कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर पहिल्या टप्प्यात प्रवेश निश्चित केला जात आहे. त्यानुसार पालकांना मेसेजही पाठविण्यात येत आहे. त्यानंतर कागदपत्रांची तपासणी करून प्रवेश अंतिम केले जात आहेत.


























































