संचित: ‘अर्क’ चित्रकार!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>दिलीप जोशी

मिश्किल शाब्दिक कोपरखळय़ांना कुंचल्यातून प्रभावी करणारे वसंत सरवटे यांच्या ध्वनिमुद्रणाच्या या आठवणी. 

मुंबईत पार्ल्याला अर्कचित्रकार वसंत सरवटे यांच्या घरी गप्पा रंगल्या होत्या. एका दिवाळी अंकासाठी त्यांची मुलाखत घेत होतो. राहुल पाटील व्हिडीओ चित्रण करीत होता. ‘ललित’ या मॅजेस्टिक प्रकाशनाच्या साहित्यविषयक मासिकातले लेखक जयवंत दळवी यांचे भल्याभल्या लेखक-कवींची टोपी उडवणारे मिष्किल लिखाण ‘घटिका गेली पळे गेली’ या सदरात प्रसिद्ध व्हायचे. त्याची नंतर चर्चाही व्हायची. कुणाला गंमत वाटायची, कुणाला रागही यायचा. एवंगुणविशिष्ट सदराच्या लेखकाने टोपणनाव (पेन-नेम) घेतले होते ते ‘ठणठणपाळ’! त्याचे भरदार मिशा असलेल्या पहेलवानासारखे आणि हातात ‘तास’ (धातूची गोल चकती) वाजवण्यासाठी असलेला लाकडी हातोडा! या चित्रातून दळवी करतात ते विनोदी-उपरोधिक प्रहार आणि त्यातून निर्माण होणाऱया खळबळीचा नाद  हे दोन्ही ध्वनित व्हायचे. ललितचे मुखपृष्ठही सरवटे यांचेच असायचे.

3 फेब्रुवारी 1927 हा त्यांचा जन्मदिन. बालपणापासून चित्रकलेची आवड असलेले सरवटे यांना कोल्हापूरसारख्या कलानगरीत कलासाधनेला भरपूर वाव होता. त्यावेळी तिथे कपिलतीर्थावरची गर्दी आणि विविध विक्रेत्यांची लगबग वगैरे गोष्टींचे ‘रॅपिड स्केचिंग’ (त्वरित रेखाटन) करायला अनेक चित्रकार यायचे. तिथेच आपणही चित्रकार व्हावं असं वाटू लागलं.

वसंत सरवटे यांचे पहिले व्यंगचित्र प्रसिद्ध झाले ते कोल्हापूरच्या ‘राजारामियन’ या महाराजा राजाराम कॉलेजच्या नियतकालिकात. सरवटेंच्या शब्दात ‘त्या वेळी मी दीनानाथ दलाला’च्या चित्रांची नक्कल करायचो. दलाल आणि डेव्हिड लो ब्रशने चित्र काढत असत. पण पुढे आपली शैली वेगळी असावी म्हणून फाउंैटन पेनने चित्र काढण्याचे ठरवले. मग आधी टाक आणि नंतर ‘रोटर इंक’चा पेन वापरू लागलो. सरवटे यांच्या पहिल्या व्यावसायिक चित्राला ‘हंस’ मासिकाने दोन रुपयांचे मानधन दिले होते. पेनाने रेखाटन करण्याबरोबरच सरवटे यांनी चित्रकलेत अनेक प्रयोग केले. अक्षरांची व्यंगचित्रे, बोटाच्या ठशांची व्यंगचित्र वगैरे.

‘माणूस’ साप्ताहिकात सरवटेंनी राजकीय धर्तीची (सेमीपोलिटिकल) व्यंगचित्रे काढली. मात्र त्यांचे सख्य जमले ते ‘ललित’ मासिकाशी. ‘ललित’चे चित्रकार म्हणजे वसंत सरवटे ही समीकरणे चित्ररसिकांच्या मनातही रुजली. फडणीस आणि सरवटे राजकीय व्यंगचित्रांकडे वळले नाहीत. त्या वेळी ते क्षेत्र बाळासाहेब ठाकरे आणि लक्ष्मण यांनी व्यापले होते. फडणीसांप्रमाणेच स्वतंत्र शैली निर्माण केलेल्या सरवटे यांनी ‘ललित’मधून आपला प्रभाव पाडला. ‘ठणठणपाळ’बरोबरच ‘ललित’मधली इतरही चित्रे त्यांच्या बारीक रेषेने भरगच्च भरलेल्या विविध आशयांची असायची. पु. ल. देशपांडे यांच्या ‘खिल्ली’ या लेखसंग्रहाचे कव्हर आणि आतली चित्रे सरवटे यांचीच होती.

मासिक, नियतकालिकांतून वाचकांशी, चित्ररसिकांशी चाललेला संवाद सरवटेंनी थेट प्रदर्शनापर्यंत नेला. तिथे अनेक चाहते भेटायचे. चित्रांचे प्रात्यक्षिक दाखवण्यापेक्षा ते कसे सुचते ते रसिकांना सांगण्यावर सरवटे याचा भर असायचा. अगदी लहान गावात, खेडोपाडय़ातही त्यांच्या चित्र प्रदर्शनाला उत्तम प्रतिसाद मिळायचा. सरवटे यांच्या व्यंगचित्रांविषयी विख्यात लेखक विजय तेंडुलकर यांनी म्हटले होते की, ते केवळ हास्य चित्रकार नाहीत तर आपल्या कुंचल्याने (पेनाने) जीवनविषयक गोष्टींचा हळुवार शोध घेणारे तत्त्वचिंतक वाटतात. एका दृश्य माध्यमातून अदृश्याचा वेध घेण्याची त्यांची प्रवृत्ती जाणवते. त्यांची वरकरणी साधी-सोपी वाटणारी रेखा आपल्याला नकळत तिकडे खेचत असते ती हिसक्याने नव्हे, खुबीने, आर्जवाने आणि हसतखेळत!

वसंत सरवटेंच्या चित्रशैलीवरचे हे यथायोग्य भाष्य. ‘ललित’चे चित्रकार हे समीकरण असेपर्यंत कायम राहिले. सरवटे यांचे अवधूत परळकर यांनी संपादन केलेले ‘सर्वोत्तम सरवटे’ हे पुस्तक प्रसिद्ध झाले. त्यांच्या दोन व्यंगचित्रसंग्रहांना राज्य शासनाचा पुरस्कारही मिळाला. सरवटे यांनी ‘सहप्रवासी’ आणि ‘व्यंगचित्र ः एक संवाद’ अशी पुस्तके लिहिली. तीही पुरस्कारप्राप्त ठरली.2016 मध्ये वयाच्या 82 व्या वर्षी या शैलीदार चित्रकाराने जगाचा निरोप घेतला. जयवंत दळवींचे ‘ललित’मधले ‘ठणठणपाळ’चे सदरही त्यांच्या जाण्यानंतर थांबले. मिष्किल शाब्दिक कोपरखळय़ांना अधिक प्रभावी करणारी चित्रे असा शब्द-चित्र संयोग त्या वेळच्या ‘ललित’मध्ये दिसायचा. काही वर्षांपूर्वी ‘ललित’चे जुने अंक चाळताना तो सगळा काळ नजरेसमोर आला. त्यातील व्यक्तिरेखा पुन्हा भेटल्यासारखे वाटले. सरवटेंची अनेक चित्रे तसाच अनुभव देत होती.याच ‘ललित’ने आपल्या चित्रकर्त्याच्या सन्मानार्थ 1977 मध्ये वसंत सरवटे विशेषांक काढला. हा एका चित्रकाराचा बहुमान होता. त्या अंकाचे मुखपृष्ठही सरवटेंचेच होते. मला आठवते त्यानुसार त्यांनी आपल्या चेहऱयाचा अर्धा फोटो आणि अर्ध व्यंगचित्र असे स्वतःला दाखवले होते. तेच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे प्रतिबिंब होते!

– [email protected]