
मार्गशीर्ष शुद्ध 01 ते मार्गशीर्ष वद्य 30 या कालावधीत श्री विठ्ठलाचे वास्तव्य विष्णुपदावर असते, अशी धारणा आहे. त्यामुळे महिनाभर विष्णुपद येथे दर्शनास भाविकांची गर्दी असते. या वर्षी 20 नोव्हेंबर ते 19 डिसेंबर यादरम्यान ‘विष्णुपद’ उत्सव साजरा होत आहे. गोपाळपूर रोडवरील विष्णुपद मंदिर येथे मंदिर समितीमार्फत भाविकांना पुरेशा सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.
मंदिर समितीने पंढरपूर शहर व परिसरातील 28 परिवार देवता सन 2015मध्ये ताब्यात घेतल्या असून, त्याचे व्यवस्थापन मंदिर समितीमार्फत चालविण्यात येते. त्यामध्ये गोपाळपूर रोडवरील चंद्रभागा नदीपात्रातील विष्णुपद मंदिराचा समावेश असून, या ठिकाणी दर्शनरांगेसाठी बॅरिकेडिंग, सुरक्षाव्यवस्थेकामी कमांडोज्, पिण्याच्या पाण्याची सोय, चांगली स्वच्छता व्यवस्था, अभिषेक पूजा भाविकांना उपलब्ध करून देणे, विद्युतरोषणाई व इतर आनुषंगिक व्यवस्था करण्यात येते. या ठिकाणी वनभोजनाची प्रथा असल्याने स्वच्छतेसाठी जादा कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. पंढरपूर नगरपरिषद प्रशासन व पोलीस प्रशासन यांनादेखील पत्रव्यवहार करून आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत पत्रव्यवहार केला आहे. संबंधित ठिकाणी नियोजनाच्या अनुषंगाने बुधवारी (19 रोजी) कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, प्र-व्यवस्थापक पृथ्वीराज राऊत, लेखा अधिकारी मुकेश अणेचा यांनी स्थळपाहणी केली. यावेळी बांधकाम विभागप्रमुख बलभीम पावले, सुरक्षा विभागप्रमुख राजाराम ढगे, विद्युत विभागप्रमुख शंकर मदने, परिवार देवता विभागप्रमुख अतुल बक्षी उपस्थित होते.




























































