
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराची चर्चा सुरू असताना विधानसभेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे अचानक दिल्लीला रवाना झाल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले. मात्र ही कोणतीही राजकीय स्वरुपाची भेट नव्हती तर विदर्भात जागतिक दर्जाचे पेट्रोकेमिकल्स काँम्प्लेक्स स्थापन करण्याच्या संदर्भात केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची भेट घेतल्याचे देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सांगण्यात आले.
विदर्भात जागतिक दर्जाचे पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स स्थापन करण्यासंदर्भातील विदर्भ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कान्सिलच्या (वेद) प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी नवी दिल्लीत केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची भेट घेतली.
या भेटीनंतर देवेंद्र फडणवीस पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, धर्मेंद्र प्रधान यांनी तत्काळ या प्रकल्पासाठी तांत्रिक व्यवहार्यता अहवाल तयार करण्यासंदर्भातील आदेश दिले आहेत. या प्रकल्पामुळे विदर्भात अनेक नवे उद्योग येतील, गुंतवणूक आणि रोजगार वाढण्यासाठी सुद्धा त्यामुळे मोठी मदत होईल. दरम्यान, नवी दिल्लीच्या भेटीत देवेंद्र फडणवीस हे भाजपचे अध्यक्ष जे.पी नड्डा, राष्ट्रीय संघटन मंत्री बी. एल. संतोष व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्यांची भेट घेणार असल्याचे सांगण्यात येते.




























































