एका पदासाठी एकाच दिवशी दोन आदेश, अधिकारांवरून फडणवीस-मिंधेंमध्ये पेटला सुप्त संघर्ष!

बेस्ट महाव्यवस्थापक पदासाठी अतिरिक्त कार्यभार मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) दोन अतिरिक्त अधिकाऱ्यांकडे देण्यात आल्याने गोंधळ वाढल्याचं पाहायला मिळत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बेस्टचा अतिरिक्त कार्यभार अश्विनी जोशी यांच्याकडे सुपूर्द केला. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खात्याकडून आशिष शर्मा यांची त्याच पदावर नेमणूक केली. एकाच पदासाठी एकाच दिवशी दोन आदेश आणि दोघांकडे अतिरिक्त कार्यभाराचा आदेश देण्यात आल्याने या दोन्ही नेत्यांमधील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

दरम्यान, राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर महायुती सरकार स्थापन झाल्यापासूनच महायुती सरकारमधील नेत्यांची तोंडे तीन दिशेला आहेत. श्रेयवाद, मतभेद, धुसफुस, कुरघोडी, स्थगित्या, नाराजीनाट्य अशी मालिका सुरूच आहे. यातच सरकार स्थापन झाल्यापासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या अनेक महत्त्वाच्या निर्णयांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती देऊन एकनाथ शिंदे यांना जोरदार धक्का दिला आहे. यातच आता पुन्हा एका या दोन्ही नेत्यांमध्ये सुप्त संघर्ष सुरु असल्याचं पाहायला मिळालं आहे.

दरम्यान, महायुती सरकार स्थापन झाल्यापासून नाराजी नाट्य करणारे एकनाथ शिंदे पुन्हा एकदा दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत. त्यांनी आज गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. तसेच सायंकाळी ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सुद्धा भेट घेणार आहेत.