बनावट ओळखपत्रांद्वारे लोकल प्रवास करणाऱयांचे प्रमाण वाढले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पश्चिम रेल्वेवर अत्यावश्यक कर्मचाऱयांसाठी दररोज 506 विशेष फेऱया चालविण्यात येत आहेत. या लोकलमध्ये सर्वसामान्यांना प्रवेश नसल्याने आता बनावट ओळखपत्रे तयार करून प्रवास करणाऱयांचे प्रमाण मोठय़ा वाढले असल्याने पश्चिम रेल्वेची डोकेदुखी वाढली आहे. दररोज सरासरी 20 जणांवर बनावट ओळखपत्र तयार करून प्रवास केल्याच्या प्रकरणात कारवाई होत आहे. 15 जून ते 2 ऑक्टोबरपर्यंत बनावट ओळखपत्राआधारे प्रवास केल्याच्या प्रकरणात जीआरपीने पाच एफआयआर दाखल केले आहेत. तसेच याच काळात विनातिकीट तसेच बेकायदेशीरपणे सामानाची वाहतूक केल्याची 4,555 प्रकरणे दाखल झाली असून 23.24 लाखांचा दंड वसुल करण्यात आला आहे.

बोरीवली स्थानकात बोगस ओळखपत्राच्या आधारे प्रवास करणाऱया एका बांधकाम मजूराला अटक झाली आहे. या कामगाराने पैसे देऊन हे ओळखपत्र मिळविल्याचे स्पष्ट झाले आहे. अंधेरी स्थानकातही झेरॉक्सच्या दुकानात काम करणाऱया एकाला बनावट ओळखपत्राआधारे प्रवास करताना पकडले आहे. त्याच्या बॉसने अन्य 50 ते 60 जणांना अशी ओळखपत्रे दिल्याचे उघड झाले आहे.

एक हजारात ओळखपत्र
एकाच एजंटने जारी केलेल्या बोगस ओळखपत्रांवर प्रवास करणाऱया दोघांना बोरीवलीत पकडण्यात आले आहे. याप्रकरणात एजंटला अटक करण्यात आली आहे. तर पालिका सफाई कामगाराकडून एक हजार रुपयात ओळखपत्र मिळवून प्रवास करणाऱयास एकाला मीरा रोडमधून पकडले आहे. विलेपार्ले येथेही एका खासगी कंपनीत काम करणाऱयाला पालिकेचे ओळखपत्र बाळगून प्रवास करताना पकडले गेले आहे. या सर्व घटनांना पाहता बनावट ओळखपत्रे वाटणाऱया मोठय़ा घोटाळ्याचा छडा लावण्याचे काम सुरू आहे.