व्हॉटस् ऍपमुळे चाकरमान्यांचा मुंबईतच मोरया, न धावणारी स्पेशल गाडी पकडण्यासाठी पळापळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गौरी-गणपती सणाला कोकणी माणूस गावी जाणारच. त्यासाठी मग एसटी नाही तर रेल्वेच्या आरक्षण खिडक्यांवर तिकिटासाठी रात्रभर ठिय्या देण्याची त्याची तयारी असते. कोकण रेल्वे मार्गावर यंदा तब्बल 210 गाडय़ा सोडण्यात आल्या आहेत. त्याही अपुऱयाच आहेत. व्हॉटस् ऍपवर फिरलेल्या एका मेसेजमुळे आज मात्र हजारो चाकरमान्यांची फसगत झाली आणि मुंबई, दादर, ठाणे स्थानकांवर प्रचंड गोंधळ उडाला.

30 ऑगस्ट रोजी रात्री 8 वाजून 50 मिनिटांनी 01153 सीएसएमटी ते थिविम ही गणपती स्पेशल गाडी सोडण्यात येणार असून 23 डब्यांची ही गाडी पूर्णतः अनारक्षित असेल, असा एक मेसेज गेल्या आठवडय़ापासून व्हॉटस् ऍपवर व्हायरल झाला होता. गावी जाताना रेल्वे आरक्षण न मिळालेल्या हजारो चाकरमान्यांसाठी ही एक आनंदवार्ताच होती. ही गाडी पकडण्यासाठी मग चाकरमान्यांनी बोजा-बिस्तारा बांधून कुटुंबकबिल्यासह रेल्वे स्थानक गाठले.

सीएसएमटी, दादर आणि ठाणे स्थानकावर चाकरमानी आले खरे, पण गाडी येण्याची वेळ झाली तरी ती न आल्याने बोंबाबोंब होऊ लागली. व्हॉटस् ऍपवरील फेक मेसेजने घात केला होता. थिविमपर्यंत जाणारी अशी कोणतीच गणपती स्पेशल गाडी नव्हती हे एव्हाना त्यांच्या लक्षात आले होते. त्यामुळे गणरायाच्या स्वागतासाठी गावी निघालेल्या चाकरमान्यांचा मुंबईतच मोरया झाला.

मध्य रेल्वे म्हणाली…
अशी कोणतीही गाडी आमच्या वेळापत्रकात नसल्याचे मध्य रेल्वेचे वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी ए. के. जैन यांनी सांगिलते. त्यात कोकण रेल्वेनेही हा संदेश बनावट असल्याचे सांगत प्रवाशांनी अशा संदेशांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन केले आहे. तुतारी एक्स्प्रेस, एलटीटी ते मडगाव एसी डबल डेकरला जादा डबे लावण्यात आल्याचे प्रवाशांना अधिकाऱयांनी सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रवासी थिविम गाडी चालविण्याच्या हट्टावर कायम राहिल्याने गोंधळ उडाला.