
परळी येथील महावितरण कंपनीने विद्युत मीटरचे खोटे व बनावट रिडींग घेऊन बिल ग्राहकाला देऊन जास्त बिलाची मागणी करून फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार करण्यात आली आहे. ही फिर्याद महावितरणची कर्मचारी अधिकारी व कंत्राटदार यांच्या विरोधात संभाजीनगर परळी पोलीस स्टेशनला देण्यात आली आहे.
शहरातील नामवंत वकील अॅड. राधाकिशन विठ्ठलराव गित्ते यांनी आपल्या पत्नीच्या नावे शारदा नगर येथील घरी एक विद्युत मीटर घेतले होते. सदर विद्युत मीटर वर कोणताही मोठा वापर नसतानाही कोणतीही रिडींग न घेता सप्टेंबर महिन्याचा वापर 1133 युनिट एवढा दाखवून मागील थकबाकी सह 20880 रुपये एवढे बिल दिले. पुन्हा ऑक्टोबर महिन्यात 185 व डिसेंबर मध्ये 190 युनिट दाखवून 22 हजार पाचशे दहा रुपये इतके बिल दिले.
वास्तविक सदर मीटरवर एवढी रीडिंग कधीही आणि केव्हाही झालेली नसतानाही कार्यालयात बसून विद्युत मीटरच्या खोट्या व बनावट रिडींग दाखवून त्या आधारे बनावट बील दिल तयार करून फसवणूक करण्याच्या उद्देशाने ते ग्राहकाला पाठवले व बनावट बिलाचा खोटा दस्तऐवज तयार केला वगैरे मजकुरावरून अॅड.गित्ते यांनी संभाजीनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पवार यांची समक्ष भेट घेऊन याबाबत सहाय्यक अभियंता, उपकार्यकारी अभियंता, कार्यकारी अभियंता, खोटे व बनावट रीडिंग घेणारे कंत्राटदार व त्यांचे कर्मचारी व खोटे व बनावट बिल बनवणारे कर्मचारी यांच्यावर ग्राहकांची फसवणूक करण्याच्या उद्देशाने खोटे व बनावट दस्तऐवज तयार करण्याचा गुन्हेगारी स्वरूपाचा कट रचुन गुन्हा केल्याबाबत फिर्याद संभाजीनगर परळी पोलीस स्टेशनला करण्यात आली आहे.
सदर प्रकरणांमध्ये चौकशी करून गुन्हा दाखल करून कारवाई करण्याचे आश्वासन पोलीस निरीक्षक पवार यांनी अॅड. गित्ते यांना दिले आहे.गित्ते यांनी परभणी पोलीस अधिक्षक यांचे कायदेशीर सल्लागार म्हणून काम केलेले आहे. त्यामुळे सदर प्रकरणात गुन्हा दाखल करून दोषी कर्मचारी व अधिकारी यांच्यावर पोलीस कारवाई होते किंवा नाही याकडे सर्व जनतेचे लक्ष लागले आहे. खोट्या रडून दाखवून बनावट बिले ग्राहकांना पाठवून मोठ्याप्रमाणावर ग्राहकांची लूट करण्याचा महावितरणचा मोठा कट असल्याचे ओळखी झाले आहे. यासंदर्भात असंख्य तक्रारी महावितरण कार्यालयात दाखल झाले असून त्याबाबत महावितरण कंपनीने बील दुरुस्तीची थातुरमातुर मोहीम राबवली आहे. परंतु जे ग्राहक महावितरण पर्यंत पोहोचू शकत नाहीत त्यांना अवाढव्य बीलाचा सामना करावा लागणार आहे. महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यावर जबर कारवाई करण्याची मागणी जनतेतून होत आहे.


























































